
मुंबई - भारताच्या उद्योगविश्वात आपलं आगळंवेगळं स्थान निर्माण करणारे मुकेश अंबानी यांनी 'जिओ' या प्रकल्पाच्या माध्यमातून संपूर्ण भारताच्या डिजिटल भविष्यासाठी एक क्रांतिकारी पाऊल उचललं. त्यांनी मॅकिन्से अँड कंपनीला दिलेल्या २५ जून २०२५ रोजीच्या मुलाखतीत आपल्या कारकिर्दीतील सर्वात मोठं धाडस कोणतं होतं, यावर स्पष्टपणे उत्तर दिलं. "जिओ हे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं धाडस होतं."
ही केवळ एका उद्योगपतीची यशोगाथा नाही, तर आधुनिक भारताच्या डिजिटल परिवर्तनाची सुरुवात आहे. या मुलाखतीत अंबानींनी अनेक मुद्द्यांवर मोकळेपणाने चर्चा केली. त्यांनी केवळ रिलायन्स कंपनीच्या धोरणांचीच नव्हे तर मूल्यवस्थांचीही सखोल मांडणी केली. त्यांच्या या दृष्टिकोनातून नव्या पिढीला उद्योजकीय मार्गदर्शन लाभू शकते.
जिओ, एक क्रांतिकारी निर्णय
अंबानी म्हणतात, "जिओ सुरू करणं हे माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी रिस्क होती. त्या वेळी आम्ही स्वतःचं भांडवल गुंतवलेलं होतं, आणि मीच सर्वात मोठा शेअरहोल्डर होतो." त्यांनी बोर्डमध्ये हे स्पष्ट केलं होतं की ही गुंतवणूक अपयशी ठरली तरी चालेल, कारण ते भारतासाठी, समाजासाठी मोठं पाऊल ठरेल. अनेक तज्ज्ञांना वाटत होतं की भारत अशा अत्याधुनिक डिजिटल सेवेसाठी तयार नाही. पण जिओने हे सर्व समज चुकीचे ठरवले.
अपयशही स्वीकारायला तयार
अंबानी पुढे म्हणतात, "जर फायदा झाला नाही तरी हरकत नाही, कारण हे भारताच्या डिजिटल परिवर्तनासाठी आमचं योगदान ठरेल." म्हणजेच त्यांनी जिओच्या यशापेक्षा समाजहित अधिक महत्त्वाचं मानलं. भारताला डिजिटलपणे सशक्त करणं हेच त्यांचं मुख्य उद्दिष्ट होतं.
'स्केल' ही रिलायन्सची ओळख
रिलायन्सने नेहमी मोठ्या प्रमाणावर प्रकल्प हाती घेतले आहेत. जिओच्या माध्यमातून देशात इंटरनेट आणि डेटा सेवा अत्यंत स्वस्त झाल्या, ज्याचा फायदा थेट सामान्य नागरिकांना झाला. अंबानी म्हणतात, "आमच्यासाठी स्केल खूप महत्त्वाचा आहे."
रिलायन्स, एक प्रक्रिया, एक संस्था
अंबानी सांगतात, "माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं की, रिलायन्स ही एक संस्था आहे, जी आपल्यानंतरही टिकली पाहिजे." रिलायन्स ही केवळ व्यवसायिक यशाची कहाणी नसून, सामाजिक जबाबदारीची प्रक्रिया आहे. त्यांनी हेही सांगितलं की २०२७ मध्ये रिलायन्सची सुवर्णमहोत्सवी वर्षपूर्ती आहे, पण माझं ध्येय आहे की ती संस्था १०० वर्षांपर्यंत भारत आणि मानवतेची सेवा करत राहावी.
भविष्याशी जोडलेली दृष्टी
अंबानी म्हणतात, "रिलायन्सचा दृष्टिकोन भविष्यातील व्यवसायांशी संबंधित आहे." ६०-७० च्या दशकातील रिलायन्स आणि आजची रिलायन्स पूर्णपणे वेगळी आहे. प्रत्येक दशकात जग बदलतं, आणि व्यवसायालाही त्यानुसार स्वतःला बदलणं गरजेचं आहे. हेच रिलायन्सने सातत्याने सिद्ध केलं आहे.
पारंपरिक नियमांना तडा
अंबानी म्हणतात, "आम्ही व्यवसाय शाळांमध्ये शिकवलेल्या अनेक संकल्पनांना आव्हान दिलं." त्यांनी व्हॅल्यू चेनमधील समाकलन, तांत्रिक विस्तार, स्वयंपूर्णता यांना महत्त्व दिलं. भविष्यातील तांत्रिक संधी शोधताना त्यांनी कोणतीही संधी गमावली नाही.
जोखीम व्यवस्थापनाची तत्वज्ञान
अंबानी सांगतात, "मी जोखीम व्यवस्थापनासाठी नेहमी सर्वात वाईट शक्यता विचारात घेतो आणि त्यासाठी तयारी करतो." ही कल्पना अत्यंत व्यवहार्य असून ती प्रत्येक उद्योजकाने आत्मसात करावी अशी आहे.
प्रामाणिकपणा आणि नेतृत्व
अंबानी म्हणतात, "माझा वैयक्तिक तत्त्व आहे, मी माझ्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या डोळ्यात डोळे टाकून बघू शकतो का?" या विचारधारेमुळेच रिलायन्समध्ये नेतृत्वाला प्रामाणिकपणाचे बंधन आहे. त्यांनी आपल्या टॉप १०० लीडर्सना नेहमी सांगितलं आहे की आपण जे करतो ते योग्य असलं पाहिजे.
मूल्यवस्था आणि संस्थात्मक संस्कृती
अंबानींनी स्पष्टपणे सांगितलं की, “आपण एकमेकांच्या नजरेत बघून हे म्हणू शकायला हवं की मला लाज वाटत नाही.” ही मूल्यवस्था म्हणजेच रिलायन्सची खरी ओळख आहे. ही संस्था केवळ नफा मिळवणारी नाही, तर समाजहित जोपासणारी यंत्रणा आहे.
एक उद्योगपती, एक परिवर्तनकारी नेता
मुकेश अंबानींचे विचार, मूल्यं आणि धोरणं हे केवळ उद्योजकतेसाठी नव्हे तर भारताच्या सामाजिक व आर्थिक भविष्यासाठी मार्गदर्शक आहेत. 'जिओ'मुळे देशात डिजिटल क्रांती झाली आणि आज भारताची ओळख ‘डेटा डेमोक्रसी’ म्हणूनही निर्माण झाली आहे.
रिलायन्स ही केवळ एका कुटुंबाची संपत्ती नाही, तर ती भारताच्या भविष्याची हमी आहे. अंबानींनी जी मूल्यं मांडली, ती पिढ्यानपिढ्या उद्योजक आणि नागरिक म्हणून प्रत्येकाने आत्मसात करावी अशी आहेत. एक प्रामाणिक, दूरदृष्टी असलेला नेता, अशी ओळख मुकेश अंबानी यांची निर्माण होते आणि तीच पुढील यशाची दिशा ठरवणारी आहे.