“फक्त चहा आणि खिचडी!” भेटीवर उदय सामंत, बघा नेमके काय म्हणाले VIDEO

Published : May 13, 2025, 10:56 AM ISTUpdated : May 13, 2025, 12:00 PM IST
Raj Thackeray and Uday Samant

सार

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा गुप्त राजकीय हालचालींची वाढ झाली आहे. उदय सामंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या भेटीला वेगळाच रंग दिला आहे. “ही राजकीय भेट नव्हती,” असा स्पष्ट दावा त्यांनी केला आहे.

मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा गुप्त राजकीय हालचालींनी उफाळ घेतली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (शिंदे गट) नेते उदय सामंत यांची ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी झालेली भेट चर्चेचा विषय बनली असताना, उदय सामंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या भेटीला वेगळाच रंग दिला आहे. “ही राजकीय भेट नव्हती,” असा स्पष्ट दावा त्यांनी केला आहे.

“फक्त चहा आणि खिचडी, राजकारण नाही!”

शिवतीर्थवरून बाहेर पडताच प्रसारमाध्यमांनी घेरलेल्या सामंत यांनी दिलेल्या स्पष्टीकरणाने अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यांनी सांगितले, “मी सकाळी या भागात होतो. म्हणून राज ठाकरे यांना फोन केला. त्यांनी सहज चहा पिण्यासाठी घरी बोलावलं. आम्ही चहा घेतला, खिचडी खाल्ली आणि निघालो. आमच्यात राजकीय चर्चा झाली नाही.”

तसेच, “मुंबई महापालिका निवडणुकीबाबत जर आमच्यात चर्चा झाली असती, तर मी ती खुलेपणाने सांगितली असती. माझे आणि राज ठाकरे यांचे संबंध राजकारणापलीकडचे आहेत. त्यामुळे प्रत्येक भेटीकडे राजकीय चष्म्यातून पाहू नये,” असे त्यांनी स्पष्ट केले.

“मी शिंदे यांच्याकडे जातोय, पण राज ठाकरे यांचा निरोप घेऊन नव्हे!”

उदय सामंत यांनी हेही स्पष्ट केले की, “शिवतीर्थवरून आता मी मुक्तागिरी येथे एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी निघालो आहे. पण कृपया असा अर्थ काढू नका की, मी राज ठाकरे यांचा संदेश घेऊन शिंदे यांच्याकडे जात आहे. ही भेटदेखील स्वतंत्र आहे.”

मात्र सूत्र काहीतरी वेगळंच सांगतात…

सामंत यांनी जरी या भेटीला 'सामाजिक संवाद' म्हणून सादर केलं असलं, तरी राजकीय सूत्र वेगळाच सूर लावत आहेत. त्यांच्या माहितीनुसार, उदय सामंत यांनी राज ठाकरे यांच्यासमोर मनसे आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात युतीचा प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावाला काय प्रतिसाद मिळाला हे स्पष्ट झालेलं नाही, मात्र दोन्ही बाजूंनी हलचाली सुरू झाल्या आहेत, हे निश्‍चित.

उद्धवही युतीसाठी सकारात्मक, आता निर्णय कोणाचा?

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी युतीसंदर्भात काही काळापूर्वी शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही सौम्य आणि सकारात्मक भूमिका घेतली होती. त्यामुळे आता दोन्ही गट - शिंदे आणि उद्धव - यांच्याकडून युतीचे संकेत मिळत असताना राज ठाकरे कोणता मार्ग स्वीकारतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

 

 

उदय सामंत यांच्या "फक्त चहा आणि खिचडी" या विधानामागे खरोखरच सौहार्द होता की ही राजकीय चेसमधील एक शांत चाल होती, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. मात्र इतकं निश्चित की मनसे आजही महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणात 'किंगमेकर' ठरू शकते आणि राज ठाकरे यांचा पुढचा निर्णय राज्याच्या आगामी राजकीय नकाशावर मोठा प्रभाव टाकू शकतो.

PREV

Recommended Stories

Mumbai Third Airport : मुंबईजवळ तिसऱ्या विमानतळाचा मास्टरप्लॅन! कधी, कुठे आणि कसा? CM फडणवीसांनी दिली माहिती
पश्चिम रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! नालासोपाऱ्यात उभारले जाणार नवे रेल्वे स्थानक; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा