
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी शुक्रवारी गणपती बाप्पाचं विसर्जन केलं. पत्नी अमृता फडणवीस, कुटुंबातील इतर सदस्य आणि मंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांनी बाप्पाची आरती केली आणि त्यानंतर मूर्तीला निरोप दिला.
मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी स्वतः बाप्पाची विधीवत पूजा आणि आरती केली.आरती पार पडल्यानंतर बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन करण्यात आलं.मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या या विसर्जन सोहळ्याला अनेक मंत्री आणि मान्यवरांनी हजेरी लावली होती. सर्वांनी मिळून बाप्पाला निरोप दिला.
ॐ गच्छ गच्छ सुरश्रेष्ठ, स्वस्थाने परमेश्वर।
मम पूजा गृहीत्मेवां पुनरागमनाय च॥
LIVE | दिवस ११वा अनंत चतुर्दशीचा: श्री गणरायाची आजची आरती...
🕧 दु. १२.४४ वा. | २५-९-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई.#Maharashtra #GaneshVisarjan #GanpatiBappaMorya https://t.co/78R4byulvS— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 25, 2026
दुसरीकडे, मुंबईत लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. बाप्पाला निरोप देण्यासाठी लोक आतुरतेने वाट पाहत आहेत.
गणेश चतुर्थीला बाप्पाची स्थापना झाल्यानंतर दहा दिवस मोठ्या उत्साहात पूजा आणि आरती केली जाते. त्यानंतर अनंत चतुर्दशीला बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप दिला जातो आणि मूर्तीचं पाण्यात विसर्जन केलं जातं.मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात आज विसर्जनाचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी भव्य मिरवणुका काढण्यात आल्या आहेत. विसर्जन स्थळांवर बाप्पाला निरोप देण्यासाठी आणि शेवटचं दर्शन घेण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली आहे.