Maharashtra Day : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले हुतात्म्यांना अभिवादन

Published : May 01, 2025, 10:32 AM ISTUpdated : May 01, 2025, 11:57 AM IST
devendra fadnavis

सार

महाराष्ट्र दिनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र स्वातंत्र्य लढ्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांनी संपन्न महाराष्ट्रासाठी कटिबद्ध होण्याचा संदेश दिला.

मुंबई ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त हुतात्मा चौक येथील स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून राज्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन केले. यावेळी महाराष्ट्राला भारतातील सर्वात पुरोगामी आणि प्रगतिशील राज्य म्हणून ओळखले जाते, अशी भावना व्यक्त करताना मुख्यमंत्री म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखविलेल्या मार्गावर वाटचाल करणारा महाराष्ट्र भारताच्या विकासात सातत्याने अग्रस्थान घेत आहे. त्यांनी महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला. शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवून सर्वांना सोबत घेऊन एक प्रगत आणि समावेशी महाराष्ट्र घडवायचा आहे, हा निर्धार व्यक्त केला. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने हा संकल्प नवी ऊर्जा देणारा ठरेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्य सचिव, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त व प्रशासक, पोलीस महासंचालक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

प्रगत, संपन्न महाराष्ट्र साकारण्यासाठी कटिबद्ध होऊया ! - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असून, आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून, सहकार्यातून आणखी प्रगत, संपन्न महाराष्ट्र साकारण्यासाठी कटिबद्ध होऊया, असे आवाहन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

यानिमित्ताने मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आदी सर्व महान समाजसुधारकांना विनम्र अभिवादन केले आहे.

महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला दिलेल्या संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, “महाराष्ट्राची स्थापना ज्यांच्या बलिदानातून सत्यात आली त्या सर्व हुतात्म्यांना विनम्र आदरांजली अर्पण करतो. महाराष्ट्राने आपले थोरपण देशाच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय प्रगतीमध्ये महत्वाचे योगदान देत सिद्ध केले आहे. महाराष्ट्राने गेल्या ६५ वर्षात उद्योग, शिक्षण, आरोग्य, कृषी, कला, क्रीडा ,साहित्य ,सामाजिक न्याय अशा अनेक क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली आहे. मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी साहित्य हा आपल्या अस्मितेचा आत्मा आहे. ही ओळख जपणे आणि पुढच्या पिढीकडे पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे. महाराष्ट्र शुरवीर नरोत्तमांची पावनभूमी आहे. तशीच ती समाजसुधारकांची आणि स्वातंत्र्ययोद्ध्यांची आहे. या राज्याला ज्ञान ,वैराग्य, सामर्थ्य, त्याग, प्रतिभा आणि कला या सद्गुणांचे अलौकिक कोंदण लाभले आहे. सामाजिक प्रबोधनाचा लाभलेला वारसा, राज्यात नांदणारी शांतता, कायदा सुव्यवस्था , नैसर्गिक साधनांचा सदुपयोग करण्याचे नियोजन, प्रतिभावंत नागरिक आणि कष्ट करण्याची तयारी असणारी युवा पिढी यामुळे जागतिक पातळीवर महाराष्ट्राने आपली ओळख निर्माण केली आहे. या सगळ्याच्या पाठबळावर आणि सर्वांच्या सहकार्याने सुरक्षित, सुसंपन्न राज्य घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. येत्या काळात महाराष्ट्र हे देशातीलच नाही तर जगातील प्रगत राज्य असेल हा आपला संकल्प आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.

कामगार दिनाच्या निमित्तानेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी राज्याच्या प्रगतीत कामगारांचे मोलाचे योगदान असल्याचे अधोरेखित करून, महाराष्ट्राच्या औद्योगिक, सामाजिक आणि आर्थिक विकासात कामगार वर्गाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांच्या कल्याणासाठी आणि अधिकार संरक्षणासाठी सरकार कटिबद्ध आहे,असेही म्हटले आहे.

PREV

Recommended Stories

Mumbai Metro 8 : मुंबईकरांची प्रतीक्षा संपली! मेट्रो ८ च्या स्थानकांची 'ही' आहेत अधिकृत नावे, संपूर्ण यादी फक्त एका क्लिकवर!
महाराष्ट्रातील 2026 साठीच्या सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर, शासकीय कार्यालयांना 24 सुट्ट्या, बॅंका आणि शासकीय कर्मचाऱ्यांना 1 दिवस जास्तीची सुटी!