
मुंबई : मुंबईच्या ऐतिहासिक आणि ३०० वर्षे जुन्या सेंट थॉमस कॅथेड्रलमध्ये ख्रिसमसच्या निमित्ताने एक अभूतपूर्व सोहळा पार पडला. या कार्यक्रमाची सुरुवात 'ख्रिसमस कॅरोल्स'ऐवजी भारताच्या राष्ट्रगीताने झाली आणि या एका कृतीने सर्वांची मने जिंकली आहेत. या हृदयस्पर्शी क्षणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत असून, लाखो लोक त्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
प्रसिद्ध 'वाईल्ड व्हॉईसेस क्वायर इंडिया' (Wild Voices Choir India) या समूहाने राष्ट्रगीताचे सादरीकरण केले. फोटोग्राफर माल्कम स्टीफन्स यांनी हा क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपला आणि सोशल मीडियावर शेअर केला. केवळ काही तासांतच या व्हिडिओला २ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. चर्चमध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येकाने अत्यंत आदराने उभे राहून राष्ट्रगीताला सलामी दिली. हा सोहळा धार्मिक सण आणि राष्ट्रप्रेम यांचा एक सुंदर संगम ठरला.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहून अनेकांनी भारतीय ख्रिश्चन समुदायाचे कौतुक केले आहे. "आपल्या धार्मिक आणि राष्ट्रीय अस्मितेचा हा किती सहज आणि सुंदर स्वीकार आहे," अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. कोणत्याही गाजावाजाशिवाय पार पडलेला हा प्रोटोकॉल-सुसंगत राष्ट्रगीताचा सोहळा भारताच्या बहुविध संस्कृतीचे दर्शन घडवतो.
मुंबईत ख्रिसमसचा उत्साह केवळ चर्चपुरता मर्यादित राहिलेला नाही. वसईच्या संगीता अँजेला कुमार यांनी एक अनोखी संकल्पना राबवली. १३ डिसेंबर रोजी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत विरारहून सुटणाऱ्या एसी लोकलमध्ये ख्रिसमस कॅरोल्स (भक्तीगीते) गायली. व्हायोलिन आणि काझूच्या सुरावटीने प्रवाशांचा प्रवास सुखद झाला. "सोशल मीडियावरून मिळणाऱ्या प्रेरणेतून सर्वसामान्य प्रवाशांच्या आयुष्यात आनंद पेरण्यासाठी आम्ही हा उपक्रम राबवला," असे संगीता यांनी सांगितले.
मुंबईतील वांद्रे परिसरातही ख्रिसमसची तयारी जोरात सुरू आहे. २२ डिसेंबर रोजी सेंट सिरिल रोड ते रानवर व्हिलेज दरम्यान कॅरोल गायनाचा मोठा कार्यक्रम होणार आहे. २५ डिसेंबरच्या मध्यरात्री होणाऱ्या विशेष प्रार्थनेसाठी मुंबईतील सर्व चर्च सजली असून शहरात सर्वत्र उत्सवाचे वातावरण आहे.