
मुंबई : मुंबईतील चेंबूर येथे स्कूल बसवर झाड कोसळून 11 वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. यावर मुंबई महापालिकेने मोठी कारवाई केली आहे. सदर घटनेची गंभीर दखल घेत तीन अधिकाऱ्यांच्या निलंबाचा निर्णय घेतला आहे. याशिवाय घटनेच्या चौकशीसाठी दोन सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसेच घटनेबद्दल आठ दिवसांमध्ये चौकशी अहवाल सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
सदर घटनेप्रकरणात एम वेस्ट वॉर्डचे सहायक उद्यान अधीक्षक जगदीश भोईर, रस्ते विभागाचे अभियंता अरुण मुंडे आणि एम ईस्ट विभागाचे सहायक अभियंता योगेश पाटेन यांना निलंबित करण्यात आले आहे. अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांनी प्राथमिकदृष्ट्या निष्काळजीपणा आढळल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे स्पष्ट केले.
घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दोन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीला आठ दिवसांच्या आत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अहवालात दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, एम वेस्ट विभागाचे वॉर्ड अधिकारी शंकर भोसले यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे. या दुर्घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेत अन्य चार विद्यार्थी जखमी झाले आहेत. एका विद्यार्थ्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर महापालिकेकडून वृक्ष तोडीच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थितीत झाला आहे.
भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी मुंबईतील धोकादायक झाडांचे पुन्हा सर्वेक्षण होणार आहे. याबाबतची माहिती आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिली. सर्वेक्षणानंतर झाडांची छाटणी आणि अन्य उपाय केले जाणार आहेत.