
मुंबई : मुंबई महापालिकेने (BMC) उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आता कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. हे स्मार्ट कॅमेरे रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या माणसाची हालचाल लगेच ओळखतात आणि तिथे लावलेल्या लाउडस्पीकरवरून त्या व्यक्तीला कचरा न टाकण्याची सूचना देतात. पालिकेने या नव्या तंत्रज्ञानाचा एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केला आहे. मुंबईतील जी/उत्तर प्रभागात येणाऱ्या माहिमच्या डॉ. रायकर मार्गावरील गजानन वाटिका भागात हा प्रयोग सुरू करण्यात आला आहे. हा भाग पालिकेने कचरा साचणारे ठिकाण (GVP) म्हणून घोषित केला आहे.
🔷मुंबईतील मोठ्या प्रमाणात कचरा साचण्याच्या संभाव्य ठिकाणांवर (Garbage Vulnerable Points- GVP’s) कचरा टाकण्यास प्रतिबंध करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी/उत्तर’ विभागाने तंत्रज्ञानाधारित अभिनव उपक्रम सुरू केला आहे.
🔷माहीम येथील डॉ. रायकर मार्गावरील गजानन वाटीका येथे कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित कॅमेरा लावण्यात आला आहे.
🔷कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कॅमेरा कचरा टाकण्यासाठी यणाऱ्या व्यक्तीची हालचाल ओळखतो आणि तत्काळ ध्वनिक्षेपकाद्वारे परिसर स्वच्छ ठेवण्याचे व उघड्यावर कचरा न टाकण्याचे आवाहन करतो.
🔷महानगरपालिकेकडून येत्या काही दिवसात मुंबईत विविध ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित कॅमेरे लावण्यात येणार आहेत.
#mybmcupdates
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@SunetraA_Pawar
@ShelarAshish
@MPLodha
@TawdeRitu
@misanjayghadi
@mybmcSWM
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) October 29, 2026
पालिकेने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक माणूस गडद रंगाचा शर्ट आणि फिकट रंगाची पॅन्ट घालून रस्त्यावरून चालताना दिसतो. रस्त्याच्या कडेला गाड्या पार्क केलेल्या आहेत आणि झाडे आहेत. तो माणूस हातातली हिरवी प्लास्टिकची पिशवी हळूच खाली ठेवतो आणि तिथून निघून जाऊ लागतो.
त्यानंतर व्हिडिओमध्ये सीसीटीव्हीचे व्ह्यू दिसतो. त्यामध्ये एआय सिस्टीम हिरव्या रंगाच्या ट्रॅकिंग बॉक्सद्वारे त्या माणसाच्या हालचालींवर रिअल-टाइम लक्ष ठेवताना दिसते. ही सिस्टीम संशयास्पद हालचाली कशी टिपते, हे यात स्पष्ट दाखवले आहे.
हा एआय कॅमेरा विशेष डिझाइन केलेला आहे. कोणतीही व्यक्ती कचरा टाकण्याच्या उद्देशाने त्या जागेजवळ आली की सिस्टीम लगेच अलर्ट होते. त्यानंतर लगेचच ध्वनिक्षेपकावरून आवाज येतो आणि त्या व्यक्तीला कचरा न टाकता परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले जाते.
येत्या काही दिवसांत मुंबईतल्या इतरही अनेक कचरा प्रवण क्षेत्रांत (GVPs) अशाच प्रकारचे एआय कॅमेरे बसवण्याची योजना असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
सोशल मीडियावर महापालिकेच्या या उपक्रमाचे जोरदार स्वागत होत आहे. मुंबईतील कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी तंत्रज्ञानाचा असा योग्य वापर केल्याबद्दल नागरिक आनंद व्यक्त करत आहेत. तर काही जणांनी ही सिस्टीम इतर भागातही लवकरात लवकर बसवण्याच्या सूचना केल्या आहेत.