
मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मुंबई क्राईम ब्रांचने गुरुवारी एक मोठी कारवाई केली आहे. हरियाणातील सोनिपत पोलिसांच्या मदतीने क्राईम ब्रांचच्या टीमने आणखी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासात मिळालेल्या ठोस माहितीच्या आधारे क्राईम ब्रांचने ही कारवाई केली असून सोनिपत येथून या संशयिताला पकडलं आहे. सध्या त्याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
याआधी, गुरुवारी या प्रकरणातील सर्व आरोपींना विशेष मकोका (MCOCA) न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने सर्व आरोपींना ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मुंबई पोलिसांनी ११ आरोपींच्या १० दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती, ज्यावर सुनावणी घेत न्यायालयाने त्यांना ६ नोव्हेंबरपर्यंत पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे.
सुनावणीदरम्यान नवव्या क्रमांकाच्या आरोपीची मेडिकल हिस्ट्री न्यायालयासमोर मांडण्यात आली. या आरोपीची एकच किडनी काम करत असून दुसरी किडनी निकामी झाली आहे. सुनावणीनंतर वकील अजिंक्य मिरगल मधुकर म्हणाले, "आम्ही नवव्या आरोपीचे सर्व वैद्यकीय कागदपत्रे कोर्टासमोर ठेवले आहेत. त्याला एकच किडनी आहे... सुरुवातीला मुंबई पोलिसांनी डिजिटल आणि आर्थिक तपासासाठी, तसेच जप्त केलेल्या फोनमधून डेटा काढण्यासाठी आरोपींच्या कोठडीची गरज असल्याचा युक्तिवाद केला. पण आम्ही कोर्टात स्पष्ट केलं की, या सर्व गोष्टी आधीच जप्त केल्या आहेत, त्यामुळे आरोपींना प्रत्यक्ष कोठडीत ठेवण्याची आता गरज नाही."
न्यायाधीशांनी सर्व आरोपींशी थेट संवाद साधत त्यांची काही तक्रार किंवा म्हणणं आहे का, अशी विचारणा केली. तसंच त्यांना मराठी भाषा समजते का, हे तपासून घेत तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश दिले.
मुंबई पोलिसांनी या प्रकरणातील सर्व आरोपींवर मकोका (MCOCA, 1999) अंतर्गत कडक कारवाई केली आहे. १९ ऑक्टोबर रोजी गुन्हे अन्वेषण विभागात (DCB-CID) भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९(१), ३(५) आणि शस्त्र कायद्याच्या कलम ३, २५ अन्वये गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर २७ ऑक्टोबर रोजी सक्षम प्राधिकरणाने मकोका लावण्याची परवानगी दिली. त्यानुसार सर्व आरोपींवर मकोकाची कलमं ३(१)(ii), ३(२) आणि ३(४) वाढवण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
यापूर्वी सोमवारी मुंबईच्या किल्ला कोर्टाने कुणाल, सुमित, राधा आणि बबिता या चार आरोपींना २८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी दिली होती. हे प्रकरण १८ ऑक्टोबरच्या संध्याकाळी ७ वाजता जुहू येथे घडलं होतं. टायगर श्रॉफ एका फुटबॉल क्लबमधून बाहेर पडत असताना त्याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यात टायगर बालंबाल वाचला, मात्र त्याचा ड्रायव्हर जखमी झाला होता.