
महाराष्ट्र दिन 2025 : “मुंबई आमची आहे, महाराष्ट्राची आहे!” ही घोषणा केवळ एक वाक्य नव्हती, तर ती होती एका स्फुल्लिंगाची, जी संपूर्ण मराठी मनात पेटलेली होती. १९५०च्या दशकात सुरू झालेली संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही स्वातंत्र्यानंतरची महाराष्ट्रासाठीची सर्वात मोठी जनआंदोलनात्मक लाट होती. पण या चळवळीतील अनेक नावे आज विस्मरणात गेली आहेत. ज्यांनी स्वतःच्या कुटुंबाचा, आयुष्याचा आणि अगदी प्राणांचाही त्याग केला, परंतु ज्यांचा उल्लेख आज फारसा होत नाही.
१९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला, पण भाषावार प्रांतरचना पूर्ण झालेली नव्हती. मराठी भाषिकांचे राज्य निर्माण व्हावे, मुंबई त्यात यावी, ही मराठी जनतेची मागणी होती. पण सत्ताधाऱ्यांनी मुंबईला स्वतंत्र शहर राज्य ठेवण्याचा प्रस्ताव दिला. यामुळेच जन्म झाला ‘संयुक्त महाराष्ट्र समिती’चा आणि सुरू झाला स्वातंत्र्यानंतरचा दुसरा महत्त्वाचा लढा.
या लढ्यात केवळ राजकारणी नव्हते. शिक्षक, विद्यार्थी, महिला, शेतकरी, पत्रकार, कवी, लेखक, नाट्यकार, कारागीर अशा सर्वच स्तरांतील लोकांनी सहभाग घेतला. प्रसिद्ध व्यक्तींपेक्षा जास्त झगडणारे होते अज्ञात कार्यकर्ते ज्यांनी पोलीस बळाच्या छायेतही प्रचारपत्र वाटली, भित्तीपत्रकं लावली, गुप्त सभा घेतल्या, अगदी तुरुंगवासही पत्करला.
१९५५ मध्ये मुंबईच्या फ्लोरा फाउंटन येथे झालेल्या लाठीमार व गोळीबारात १५ आंदोलक ठार झाले. पुढील काही वर्षांत हा आकडा १०५ वर गेला. पण ही फक्त आकडेवारी नव्हे हे होते आपल्या मातीतले सुपुत्र. काही तर कॉलेजच्या गेटमधून थेट आंदोलनात उतरले, आणि परतलेच नाहीत. पण त्याहीपलीकडे आहेत ते अनामिक लढवय्ये, ज्यांची नावं कोणीही आज घेत नाही. कोल्हापूरमध्ये रात्रीतून हाताने सायकलवर पत्रके वाटणारे, नाशिकमध्ये पोलिसांकडून मारहाण सहन करूनही आंदोलन चालू ठेवणारे, सोलापुरात लाज न बाळगता ‘मुंबई आमचीच’ अशा घोषणा देणारे... हेच होते खरे आधारस्तंभ.
या चळवळीत महिलांचा सहभागही लक्षणीय होता. त्या केवळ सभांमध्ये हजेरी लावत नव्हत्या, तर त्यांनी आंदोलनात नेतृत्त्व केलं. सत्याग्रहात सहभागी झाल्या, तुरुंगात गेलेल्या अनेक स्त्रियांनी पुरुषांइतकंच योगदान दिलं. परंतु आज त्या महिलांच्या कथा कुठेच आपल्याला ऐकायला मिळत नाहीत.
या चळवळीला फक्त पाटील, देशमुख, जोशी अशी काही आडनावं नसून या लढ्यात गावोगावीची शेतमजूर मंडळी, कामगार, तरुण मुलं-मुली, दुकानदार, कष्टकरी होते. त्यांनी स्वतःच्या घरातही न सांगता आंदोलनात उडी घेतली. अनेक जण आज वृद्ध झाले, काही विस्मरणात गेले, पण त्यांच्या रक्तावर उभा राहिलाय हा महाराष्ट्र.
आज जेव्हा आपण महाराष्ट्र दिन साजरा करतो, तेव्हा फटाक्यांपेक्षा, सेलिब्रेशनपेक्षा आवश्यक आहे एक मनापासूनचा नम्र अभिवादन. कारण हे राज्य फक्त राजकारणाने नाही, तर जनतेच्या बळावर उभं राहिलं आहे. ही चळवळ नुसती भाषेची नव्हती. ती अस्मिता, आत्मगौरव आणि आत्मसन्मानाची होती.
संयुक्त महाराष्ट्र चळवळ हे एका राज्यनिर्मितीचं साधं पान नव्हतं, ती एक युगांतकारी जनआंदोलन होती. आणि त्या अज्ञात नायकांची आठवण करणं म्हणजेच आजचा महाराष्ट्र दिन साजरा करणं. या सगळ्या अज्ञात लढवय्यांना सलाम! जय महाराष्ट्र!