केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे सेनेला मोठी संधी? श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकरांच्या नावाची जोरदार चर्चा

Published : Jul 01, 2026, 12:18 PM IST
Shrikant Shinde and Omraje Nimbalkar

सार

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरला आहे. अशातच शिवसेनेकडून दोन खासदारांची नावे आघाडीवर आहेत. याशिवाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी दिल्लीत जाणार आहेत.

Union Cabinet Expansion : महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय घडामोडींमध्ये आता केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा केंद्रस्थानी आली आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. अशातच, येत्या दोन दिवसांत विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर आहेत. याशिवाय दोन खासदारांची नावे मंत्रिपदासाठी आघाडीवर आहेत.

श्रीकांत शिंदेंना मिळणार केंद्रीय मंत्रिपदाची संधी?

सलग तीन वेळा खासदार असलेले डॉ. श्रीकांत शिंदे यांचे नाव केंद्रीय मंत्रिपदासाठी आघाडीवर असल्याची चर्चा आहे. पक्षविस्तार, संघटन बळकटीकरण आणि अलीकडील राजकीय घडामोडींमध्ये श्रीकांत शिंदे यांची सक्रिय भूमिका दिसून आली. खासकरुन 'ऑपरेशन टायगर' मोहिमेदरम्यान श्रीकांत शिंदेंनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे श्रीकांत शिंदेंना केंद्रात मंत्रीपदाची संधी मिळू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

ओमराजे निंबाळकरांच्याही नावाची जोरदार चर्चा

ठाकरे गटातून शिंदे गटात दाखल झालेल्या खासदारांपैकी ओमराजे निंबाळकर यांचे नावही आघाडीवर आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांशी मजबूत संपर्क, जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने भूमिका आणि सक्रिय जनसंपर्क यामुळे ओमराजेंनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ठाकरे गटाकडून ओमराजेंवर जोरदार टीका करण्यात आली. पण तरीही ओमराजेंनी आपली तआपली राजकीय ताकद कायम ठेवली. त्यामुळे तरुण चेहरा म्हणून ओमराजेंना मंत्रीपदाची संधी मिळू शकते, अशी चर्चा आहे.

शिंदे गटाचे दिल्लीतील राजकीय वजन वाढले

ठाकरे गटातील सहा खासदार शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाल्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) मध्ये शिंदे गटाची ताकद वाढली आहे. सध्या शिंदे सेनेकडे एकूण 13 खासदार आहेत. तसेच तेलगू देसम पक्षानंतर (TDP) एनडीएतील हा दुसरा मोठा मित्रपक्ष ठरला आहे. यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला यावेळी अधिक प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

मागील केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदे गटाला केवळ एकच मंत्रीपद मिळाले होते. मात्र, सध्याच्या बदललेल्या राजकीय समीकरणांनंतर मित्रपक्षांना अधिक मंत्रीपदे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे येत्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाला किती प्रतिनिधित्व मिळते आणि कोणत्या खासदारांना संधी मिळते, याकडे राज्यासह देशातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Ketan Agrawal Case : लोहगड किल्ल्यावर पुन्हा पोलीस तपास; चेतन चौधरीसमोर उलगडणार घटनाक्रम
Maharashtra Rain Alert : राज्यात धुव्वादार मुसळधार पाऊस; मुंबईसह 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट