यंदाच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील युतीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या भेटीनंतर ही शक्यता बळावली आहे. दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार आहे.
मुंबई: यंदाच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे महाराष्ट्राचं राजकारण डोळे लावून बसलं आहे. 2 ऑक्टोबरला होणाऱ्या या मेळाव्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील ऐतिहासिक युतीची अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. या घडामोडींमुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
शिवसेना फुटीनंतर दसरा मेळाव्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर कोणाचा हक्क हेच मोठं राजकीय रण बनलं होतं. ठाकरे गट आणि शिंदे गट या दोघांनीही मैदानासाठी दावा केल्यानं वातावरण तापलं होतं. मात्र, यंदा या ऐतिहासिक मैदानावर मेळावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला अधिकृत परवानगी मिळाली आहे. विशेष म्हणजे, ठाकरे गटाने जानेवारी 2025 मध्ये यासाठी अर्ज केला होता आणि तब्बल नऊ महिन्यांनी त्यांना हिरवा कंदील मिळाला आहे.
35
ठाकरे-राज युतीची नांदी शिवतीर्थावरच?
या मेळाव्यात सर्वाधिक उत्सुकता आहे ती म्हणजे ठाकरे बंधूंमधील युतीची! काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी दादर येथील राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी अचानक भेट दिली. यावेळी संजय राऊत आणि अनिल परबही सोबत होते. ही बैठक तब्बल अडीच तास चालली असून, मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यामुळे दसरा मेळाव्यात या दोघांची युती जाहीर होण्याची शक्यता बळावली आहे.
शिवसेनेच्या स्थापनेपासून दसरा मेळावा हा पक्षासाठी आणि शिवसैनिकांसाठी एक अत्यंत महत्वाचा कार्यक्रम राहिला आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे दरवर्षी या व्यासपीठावरून पक्षाची दिशा ठरवत असत. सलग 40 वर्ष एकच नेता आणि एकच मैदान हा विक्रमही शिवसेनेच्या नावावर आहे.
55
शिंदे गटाने वेगळा दसरा मेळावा घेतल्यापासून मैदानावर हक्कासाठी संघर्ष सुरु झाला. आधी बीकेसी, मग आझाद मैदानावर शिंदे गटाचा मेळावा पार पडला. मात्र, यंदा पुन्हा एकदा ऐतिहासिक शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे गटाचा मेळावा होणार आहे, हे स्पष्ट झालं आहे.