हर्षवर्धन सपकाळ यांची मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्याशी भेट, भाजपाविरोधात काँग्रेस-शिवसेना एकत्र

Published : May 16, 2025, 11:14 PM ISTUpdated : May 17, 2025, 04:07 PM IST
sapkal matoshree meeting

सार

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत संविधान, लोकशाही आणि महाराष्ट्र धर्म रक्षणासाठी दोन्ही पक्ष एकत्र येण्यावर चर्चा झाली. 

मुंबई: भारतीय जनता पक्ष देशातील संविधान, लोकशाही व्यवस्था आणि महाराष्ट्र धर्माला बाधा आणत आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. ते आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेऊन बोलत होते. ही भेट शिष्टाचाराच्या निमित्ताने झाली असली, तरीही या वेळी दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय घडामोडी, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि संविधान रक्षणासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. सपकाळ यांनी स्पष्ट केलं की, "लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी काँग्रेस पक्ष शिवसेनेसोबत खंबीरपणे उभा आहे."

"भाजपा धर्माच्या नावाखाली महाराष्ट्र धर्माला गालबोट लावत आहे"

प्रबोधनकार ठाकरे यांचा विचार आजही तितकाच प्रभावशाली आहे, असं सांगत सपकाळ म्हणाले, "‘देवांचा धर्म व धर्माची देवळे’ या ग्रंथात जसा खरी धार्मिकता कशी असावी याचा मार्ग दाखवण्यात आला, तसाच आज भाजपा धार्मिकतेच्या नावाखाली महाराष्ट्र धर्माला आणि लोकशाहीला बिघडवत आहे."

स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी काँग्रेस-शिवसेना एकत्र

येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबतही यावेळी चर्चा झाली. काँग्रेसने या निवडणुकांसाठी स्थानिक नेत्यांना आघाडीच्या वाटाघाटींसाठी स्वायत्तता दिली आहे, अशी माहिती सपकाळ यांनी उद्धव ठाकरे यांना दिली. "निवडणुकीची अधिसूचना निघाल्यानंतर मित्र पक्ष एकत्र येऊन रणनीती ठरवतील," असंही त्यांनी सांगितलं.

पुस्तकांची सौजन्य भेट

या भेटीच्या वेळी सौजन्य भेटवस्तूंची देवाणघेवाणही करण्यात आली. उद्धव ठाकरे यांनी सपकाळ यांना लोणार सरोवर, पंढरपूर वारीवर आधारित फोटोग्राफी पुस्तकं आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्र संग्रहाची प्रत भेट दिली. त्यास प्रतिसाद देत हर्षवर्धन सपकाळ यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावरील पुस्तक उद्धव ठाकरे यांना भेट दिलं.

भारतीय सैन्याचा गौरव, भाजपाच्या नेत्यांवर टीका

सपकाळ यांनी 'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल भारतीय सैन्याचे कौतुक केलं असलं तरी, काही भाजपा नेत्यांच्या बेताल विधानांवर तीव्र निषेध नोंदवला. "मध्य प्रदेशातील मंत्री विजय शाह आणि उपमुख्यमंत्री जगदीश देवरा यांची विधाने भारतीय सैन्याचा अपमान करणारी आहेत. भाजपाचे हे वाचाळ नेते देशाच्या वीर जवानांचा अपमान करत आहेत, याची जबाबदारी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी घ्यावी आणि त्यांनी जाहीर माफी मागावी," अशी मागणी त्यांनी केली.

हर्षवर्धन सपकाळ आणि उद्धव ठाकरे यांची ही भेट केवळ शिष्टाचारापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर भाजपाविरोधात लढण्यासाठी संविधानप्रिय आणि महाराष्ट्र धर्म रक्षणाच्या भूमिकेतून उभी राहणाऱ्या आघाडीची दिशा निश्चित करणारी ठरली आहे.

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

गोव्यातील नाईटक्लब 'बर्च बाय रोमियो लेन'ला भीषण आग, 4 पर्यटकांसह 23 ठार तर 50 जखमी!
महाराष्ट्रात 'थंडीचा कहर'! तापमान 'मायनस'मध्ये जाणार; 'या' ३ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट, तुमच्या शहराचं तापमान तपासा!