
ठाणे : महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील भाईंदरमध्ये एका खाजगी शाळेचा अजब कारभार समोर आला आहे. एका विद्यार्थ्याने शाळेच्या डब्यात मेथीची भाजी आणली म्हणून त्याला चक्क ५० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. या घटनेमुळे मोठा वाद निर्माण झाला असून, मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
मेथीची भाजी आणणं हा गुन्हा आहे का?
मिळालेल्या माहितीनुसार, तपोवन विद्यालय या शाळेत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने घरून डब्यात मेथीची भाजी आणली होती. पण शाळेने त्याला ती भाजी खाऊ दिली नाही. त्याऐवजी त्याला कॅन्टीनमधून जेवण देण्यात आलं. यासाठी विद्यार्थ्याकडून ५० रुपये दंडही वसूल करण्यात आला, असा आरोप पालकांनी केला आहे.
ही घटना जैन समुदायाचा महत्त्वाचा सण असलेल्या पर्युषण पर्वाच्या काळात घडल्याचं सांगितलं जात आहे. या काळात जैन बांधव धार्मिक परंपरेनुसार हिरव्या पालेभाज्या आणि कंदमूळ खाणं टाळतात. याच कारणामुळे शाळेने काही विशिष्ट पदार्थांवर बंदी घातली होती, असा आरोप होत आहे.
पण, शाळेचे हे नियम सर्वच विद्यार्थ्यांवर लादणं आणि डब्यात भाजी आणली म्हणून थेट दंड वसूल करणं कितपत योग्य आहे, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
मेथीची भाजी आणल्याबद्दल विद्यार्थ्याला दंड केल्याची तक्रार पालकांनी केली. त्यानंतर महापालिकेच्या शिक्षण विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या निवडीवर अशी बंदी घालता येते का आणि दंड आकारण्याचा अधिकार शाळेला कोणी दिला, याबाबत स्पष्टीकरण मागवण्यात आलं आहे.
शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, डब्यात विशिष्ट पदार्थ आणल्यावरून विद्यार्थ्याला दंड करणं ही अत्यंत गंभीर बाब आहे. यावर शाळेकडून सविस्तर उत्तर मागवण्यात आलं आहे.
या गंभीर आरोपांवर शाळा प्रशासनाने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे ५० रुपये दंड नेमका का आकारला आणि शाळेचे जेवणाबाबतचे नेमके नियम काय आहेत, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. दरम्यान, या घटनेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून संताप व्यक्त केला जात आहे.