
मुंबई : राज्यातील एसटी प्रवाशांसाठी एक आनंददायक बातमी आहे! महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) ने लांब व मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना जबरदस्त सवलत देण्याची घोषणा केली आहे. ही योजना १ जुलै २०२५ पासून संपूर्ण राज्यात लागू होणार आहे.
१५० कि.मी.पेक्षा जास्त प्रवास असलेल्या मार्गांवर पूर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना १५% सवलत मिळणार आहे. ही सवलत फक्त आगाऊ आरक्षण करणाऱ्यांनाच मिळेल. सवलतधारक प्रवासी (जसे की ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी इ.) या योजनेत सहभागी नाहीत. ही ऑफर दिवाळी आणि उन्हाळी सुट्यांच्या गर्दीच्या काळात लागू नसेल, पण इतर सर्व वेळी वर्षभर लागू असेल.
ही योजना १ जुलैपासून सर्व प्रवाशांना लागू होणार असून, प्रवाशांनी याचा पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला जाणाऱ्या नियमित बसांवर ही सवलत लागू असेल. गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनाही ही सवलत लागू होणार आहे, पण ही सुविधा फक्त नियमित बसेससाठी असेल जादा बसेससाठी नाही.
मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या इ-शिवनेरी AC बसमधील प्रवाशांनाही ही १५% सूट मिळणार आहे. ही आरक्षण सुविधा खालील मार्गांनी घेता येऊ शकते.
१. तिकीट खिडकीवर
२. public.msrtcors.com या अधिकृत वेबसाइटवर
३. MSRTC Bus Reservation मोबाईल अॅपद्वारे
आगाऊ आरक्षण करा आणि प्रवास खर्चात बचत करा! एसटी महामंडळाची ही योजना प्रवाशांसाठी एक मोठा दिलासा ठरणार आहे. प्रवास करायचा असल्यास, १ जुलैनंतर आगाऊ आरक्षण करा आणि १५% सवलतीचा लाभ घ्या!