नागपूर - सातवीच्या निकालाचं ‘टेन्शन’, १२ वर्षीय मुलगी बहिणीसह घरातून निघाली, सहा तासांत पोलिसांनी शोधलं

Published : May 03, 2025, 01:22 PM IST
school girl

सार

दहावी-बारावीच्या परीक्षा निकालांमुळे विद्यार्थी तणावात येतात, हे ऐकिवात आहे. मात्र आता स्पर्धेचं आणि अपेक्षांचं ओझं इतकं वाढलं आहे की, चक्क सातव्या इयत्तेच्या निकालाचं ‘टेन्शन’ घेऊन एका १२ वर्षीय मुलीने घर सोडण्याचा निर्णय घेतला.

नागपूर – दहावी-बारावीच्या परीक्षा निकालांमुळे विद्यार्थी तणावात येतात, हे ऐकिवात आहे. मात्र आता स्पर्धेचं आणि अपेक्षांचं ओझं इतकं वाढलं आहे की, चक्क सातव्या इयत्तेच्या निकालाचं ‘टेन्शन’ घेऊन एका १२ वर्षीय मुलीने घर सोडण्याचा निर्णय घेतला. तिने चार वर्षांची बहीणही सोबत घेतली आणि घरातून निघून गेली. ही घटना गुरुवारी नागपूरच्या नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

निकालाची चिंता आणि पळण्याचा निर्णय

ही मुलगी मध्यमवर्गीय कुटुंबातील असून तिचे आईवडील दोघेही खाजगी नोकरी करत आहेत. शुक्रवारी सातव्या इयत्तेचा निकाल लागणार असल्यामुळे ती तणावाखाली होती. गुरुवारी संध्याकाळी ६ वाजता तिने आजी-आजोबांसोबत उद्यानात जात असल्याचे सांगून घर सोडले आणि आपल्या लहान बहिणीसोबत निघाली.

शोधमोहिम आणि पोलिसांची तत्परता

मुली उशीरापर्यंत घरी परतल्या नाहीत, त्यामुळे घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. अखेर नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सीसीटीव्ही फूटेज तपासले. या फूटेजमध्ये मुली विविध चौक व परिसरात पायी जाताना दिसून आल्या.

रेल्वे स्थानकात मुली सापडल्या, समुपदेशन करून पालकांकडे सुपूर्द

मुली रेल्वे स्थानकाच्या परिसरात असल्याची माहिती मिळताच, सहायक पोलीस आयुक्त नरेंद्र हिवरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तेथे धाव घेतली आणि दोघी मुली सुखरूप आढळल्या. त्या लगेच नंदनवन पोलीस ठाण्यात नेण्यात आल्या. सुरुवातीला मोठ्या मुलीने "कोणी अज्ञात व्यक्ती कारमध्ये घेऊन गेलं" असा बनाव केला, पण पोलिसांनी विश्वासात घेतल्यावर तिने खरे कारण सांगितले – निकालाची चिंता आणि उशीर झाल्याने घरच्यांच्या रागाची भीती.

पोलीस पथकाचे कौतुक

या शोधमोहीमेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत पाटील, राहुल शिरे, मुकुंद ठाकरे, कमलाकर गड्डीमे, दिगंबर बोरकर यांचे महत्त्वाचे योगदान होते. पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

PREV

Recommended Stories

पुणे रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! १० दिवसांचा ‘मेगाब्लॉक’; अमरावती-नागपूरसह ११ गाड्या रद्द
भाजपचा मोठा 'यू-टर्न'! बदलापूर प्रकरणातील सहआरोपीचा २४ तासांत राजीनामा; चौफेर टीकेनंतर अखेर नामुष्की