
मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचा एक वादग्रस्त व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते बनियनवर बेडवर बसलेले दिसत असून बाजूलाच पैशांनी भरलेली बॅग असल्याचा दावा केला जात आहे. यावरून राजकीय वातावरण तापले असून आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही या प्रकरणात उडी घेत, थेट शिरसाटांना खुलं आव्हान दिलं आहे.
अंजली दमानिया यांनी एक्स (पूर्वीचं ट्विटर) वरून शिरसाट यांचा व्हिडीओ शेअर करत त्यांच्यावर सवालांचा भडीमार केला. “मला संजय शिरसाटांची कमाल वाटते. बॅगमध्ये पैसे स्पष्ट दिसत असताना, ते म्हणतात ती कपड्यांची बॅग आहे! अशी विधानं करणं म्हणजे लोकांच्या डोळ्यांदेखत फसवणूक आहे.”
दमानिया पुढे म्हणाल्या की, “मी स्वतः हा व्हिडीओ झूम करून पाहिला, फोटोही काढले. यात स्पष्टपणे नोटांच्या बंडलांचा आकार दिसतो. कपडे असते, तर त्याचा फोल्ड वेगळा असता. त्यामुळे शिरसाट काय लपवू पाहतायत?”
शिरसाट यांनी या व्हिडीओबाबत दिलेल्या स्पष्टीकरणावर दमानिया यांनी थेट आव्हान दिलं. “जर हा व्हिडीओ तुमच्या घरातीलच आहे, आणि तुम्ही खरं बोलत असाल, तर आजच माध्यमांना घरी घेऊन जा आणि दाखवा. ही तीच रूम आहे आणि त्या बॅगेत कपडेच होते!” त्यांनी हेही स्पष्ट केलं की, जर कोणी खोटं बोलत असेल, तर त्याचा पर्दाफाश होणं आवश्यक आहे. त्यामुळे त्यांनी शिरसाट यांना सरळपणे सिद्ध करायला सांगितलं की, व्हिडीओतली रूम व बॅग घरातीलच आहे व निर्दोष आहात.
दमानिया यांनी एक मुद्दा वेगळा उपस्थित करत म्हटलं, “माझं वैयक्तिक मत आहे की, कोणत्याही व्यक्तीच्या बेडरूममध्ये CCTV असणं चुकीचं आहे. ती वैयक्तिक गोष्ट आहे. त्यामुळे व्हिडीओ कुठून व कसा लीक झाला, हाही एक स्वतंत्र तपासाचा मुद्दा आहे.”
या संपूर्ण गोंधळावर मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, “हा व्हिडीओ माझ्या घरातीलच आहे. प्रवास करून आलो होतो, त्यामुळे आरामात बेडवर बसलो होतो. बॅग कपड्यांची आहे, पैसे नाहीत. बाजूला माझा कुत्राही आहे. हा एक खासगी क्षण आहे, त्याचा राजकीय वापर केला जातोय.” त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करत म्हटलं की, “त्यांचे आरोप हास्यास्पद आणि तथ्यहीन आहेत.”