
मुंबई : भाजपने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदासाठी अखेर नाव जाहीर केलं असून, रविंद्र चव्हाण यांच्यावर एकमुखी निवड होणार असल्याचं निश्चित झालं आहे. आज पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी औपचारिक अर्ज दाखल केला आणि या निवडीवर शिक्कामोर्तब झालं. विशेष म्हणजे, वरळी डोम येथे 1 जुलै रोजी होणारा पदग्रहण समारंभ, हे ठाकरेंच्या पारंपरिक बालेकिल्ल्यात भाजपचे पहिले मोठे शक्तिप्रदर्शन ठरणार आहे.
संपूर्ण राज्यभरातून भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. 1 कोटी 51 लाखांहून अधिक प्राथमिक सदस्य नव्या नेतृत्वाची वाट पाहत होते. आज ही प्रक्रिया औपचारिकरित्या सुरू झाली असून केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल झाला.
रविंद्र चव्हाण यांच्या नावावर गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची पसंती होती. पक्षातर्फेही अनेक नेत्यांनी स्पष्टपणे म्हटलं की, “पहिला फॉर्म मी भरलेला आहे,” हे सांगत त्यांच्या नावाला पाठिंबा दिला. चव्हाण यांचा संयम, संघटनशक्ती आणि जनसंपर्क या बाबींमुळे पक्षासाठी ते योग्य नेतृत्व ठरणार असल्याचा भाजपचा विश्वास आहे.
रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजप आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आक्रमक भूमिका घेणार आहे. संघटनात्मकदृष्ट्या पक्ष अधिक बळकट करण्यासाठीही त्यांचं नेतृत्व महत्त्वाचं ठरेल. त्यामुळेच 1 जुलै रोजीचा भव्य समारंभ हा फक्त पदग्रहण नसून, पक्षाच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरणार आहे.
रविंद्र चव्हाण यांचा पदग्रहण सोहळा मुंबईच्या वरळी डोममध्ये, म्हणजेच ठाकरेंचा पारंपरिक बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या भागात होतो आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला केवळ राजकीय नाही, तर प्रबळ शक्तिप्रदर्शनाचं स्वरूप प्राप्त झालं आहे.