सुनील तटकरे यांच्यावर रामदास कदमांचे गंभीर आरोप, रोहित पवारांनी तपासावरच उपस्थित केले प्रश्न; म्हणाले...

Published : Nov 09, 2026, 08:05 PM IST
Ajit Pawar Death Case

सार

शिवसेना नेते रामदास कदम यांनी अजित पवारांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी सुनील तटकरे यांच्या चौकशीची मागणी केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

मुंबई : रायगड जिल्ह्यातील महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय संघर्ष आता चांगलाच पेटला आहे. शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कदमांच्या या गंभीर आरोपांवर आमदार रोहित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

रामदास कदमांचे सुनील तटकरेंवरील आरोप

रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्या महत्त्वाकांक्षेवर प्रश्न उपस्थित करत त्यांच्यावर गंभीर आरोप केले. तटकरे यांना उपमुख्यमंत्री व्हायचे होते, असे आपण ऐकल्याचा दावा त्यांनी केला. तसेच तटकरेंच्या महत्त्वाकांक्षा राक्षसी असून त्या पूर्ण करण्यासाठी ते काहीही करू शकतात, असेही कदम म्हणाले.

अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूमागे घातपाताची शक्यता आहे का आणि या प्रकरणात सुनील तटकरे यांचा काही संबंध आहे का, या दिशेने तपास करण्याची मागणीही रामदास कदम यांनी केली. रामदास कदमांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे.

रोहित पवारांचा तपास यंत्रणांवर गंभीर आरोप

रामदास कदम यांच्या वक्तव्यावर रोहित पवारांनीही प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले की, रामदास कदम यांचे आरोप आपण ऐकलेले नाहीत. मात्र, अजित पवारांच्या अपघाताचा तपास ज्या पद्धतीने व्हायला हवा होता, तसा होत नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली.

रोहित पवार म्हणाले की, अजितदादांच्या अपघाताचा तपास संथगतीने सुरू आहे. सत्तेत असलेले लोक या प्रकरणात आवश्यक ती भूमिका घेताना दिसत नाहीयेत. महाराष्ट्रात साधा एफआयआरदेखील दाखल होत नाही, ही दुर्दैवी बाब आहे. सत्ताधारी योग्य पद्धतीने तपास करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. दिवाळीनंतर या प्रकरणासंदर्भात शेवटचे प्रेझेंटेशन घेणार असल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले. यामुळे अजित पवारांच्या अपघाताच्या तपासाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

सुनील तटकरेंनी आरोप फेटाळले

रामदास कदम यांनी केलेले आरोप सुनील तटकरे यांनी फेटाळून लावले आहेत. तटकरे यांनी आपल्यावर करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिले. या प्रकरणावर पत्रकार परिषद घेऊन सविस्तर उत्तर देणार असल्याचेही तटकरे यांनी स्पष्ट केले.

रायगडमधील महायुतीचा अंतर्गत संघर्ष चिघळला

रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष याआधीही अनेकदा समोर आला आहे. खेडमधील पोयनार धरणाच्या भूमिपूजन कार्यक्रमात खुर्चीवरून झालेल्या वादानंतर हा संघर्ष अधिक तीव्र झाला. रामदास कदम यांच्या वक्तव्यावर सुनील तटकरे यांचे मेव्हणे आणि जिल्हा परिषद सदस्य अजय बिरवटकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत प्रत्युत्तर दिले होते.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी हा वाद स्थानिक राजकीय संघर्षातून निर्माण झाल्याचे म्हटले आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही कदमांच्या आरोपांनंतर चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे महायुतीतील अंतर्गत वादाला आता राज्यस्तरीय राजकीय स्वरूप प्राप्त झाले आहे.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Pune Metro Pink Line : पुण्यात इतिहास, देशातील पहिली महिला संचालित मेट्रो सेवा सुरू
Fadnavis Diwali : फडणवीसांनी शेतकऱ्यांसोबत साजरी केली दिवाळी, पंतप्रधान मोदींकडून कौतुक