
मुंबई : पुण्यातील हिंजवडी परिसरातील पेइंग गेस्ट (पीजी) अकोमोडेशनमध्ये २७ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर कोमल डहाळे हिच्या हत्येमुळे महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. विप्रोमध्ये काम करणाऱ्या कोमलला सोमवारी पहाटे झालेल्या वादानंतर तिचा बॉयफ्रेंड शुभम याने मारहाण केल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे ३ च्या सुमारास ही घटना घडली. शुभमचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध असल्याचा संशय कोमलला होता. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि शुभमने तिला बेदम मारहाण केली. त्याने तिच्या डोक्यावर आणि मानेवर वारंवार ठोसे मारले आणि लाथा घातल्या.
धक्कादायक बाब म्हणजे, दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांना माहिती देण्यापूर्वी शुभम अनेक तास कोमलच्या मृतदेहाजवळ बसून होता. त्याने अधिकाऱ्यांशी संपर्क साधून रुग्णवाहिका बोलावल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर कोमलला रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
हत्येप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.
हत्येचा तपास सुरू असतानाच, कोमलच्या कुटुंबीयांनी पीजीतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. फक्त महिलांसाठी असलेल्या पीजीमध्ये रात्रीच्या वेळी एखाद्या पुरुषाला प्रवेश कसा दिला गेला, ही त्यांची सर्वात मोठी चिंता आहे.
मृत मुलीचे नातेवाईक अक्षय इंगोले यांनी या कथित सुरक्षेतील त्रुटीवरून पीजी व्यवस्थापनाला जाब विचारला. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज आणि व्यवस्थापनाने इमारतीत प्रवेश करणाऱ्या अभ्यागतांच्या नोंदी योग्य प्रकारे ठेवल्या होत्या का, याबाबतही उत्तरे मागितली.
कुटुंबीयांच्या माहितीनुसार, या पीजीमध्ये १०० हून अधिक महिला राहतात. मारहाण इमारतीच्या आत होऊनही कोणाच्याच ही बाब कशी लक्षात आली नाही किंवा कोणीही कसा प्रतिसाद दिला नाही, असा सवालही त्यांनी केला आहे.
पीजी मालकावर कारवाई न झाल्याबद्दल कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली असून व्यवस्थापनाला जबाबदार धरण्याची मागणी केली आहे. दुसऱ्या कोणत्याही महिलेसोबत असा प्रकार घडू नये यासाठी पीजीच्या सुरक्षा व्यवस्थेची चौकशी करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
कुटुंबीयांची माहिती आणि पोलिसांचा तपास यात आणखी एक मतभेद समोर आला आहे. पोलिसांनी शुभमला कोमलचा बॉयफ्रेंड म्हटलं असलं तरी, तिच्या कुटुंबीयांनी त्यांच्या कथित नात्याची माहिती असल्याचं नाकारलं आहे.
कोमलच्या मृत्यूनंतर आपण पहिल्यांदाच शुभमचं नाव ऐकल्याचं कुटुंबीयांनी सांगितलं. दोघांचे लग्न होणार असल्याचा दावाही त्यांनी फेटाळून लावला. या घटनेशी संबंधित परिस्थिती दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप अक्षय इंगोले यांनी केला असून, सुरक्षेतील त्रुटींवरून पीजी व्यवस्थापनावर कारवाई का झाली नाही, असा सवाल त्यांनी केला आहे.
आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करत कोमलच्या कुटुंबीयांनी खटला जलदगती न्यायालयात चालवून त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. पीजी व्यवस्थापनाच्या भूमिकेची चौकशी करून कोणताही निष्काळजीपणा आढळल्यास योग्य कारवाई करण्याचे आवाहनही त्यांनी प्रशासनाला केले आहे.