Pune Porsche accident: ‘मी गप्प बसणार नाही, सगळ्यांची नावं उघड करणार’; डॉ. अजय तावरेचा इशारा

मी सर्वांची नावं घेणार, शांत बसणार नाही, डॉ. अजय तावरे यांनी पोलिसांना धक्कादायक माहिती दिली आहे.

 

Rameshwar Gavhane | Published : May 27, 2024 1:57 PM IST

कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा ब्लड रिपोर्ट बदलल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील फॉरेन्सीक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी रात्री उशीरा अटक केली. पोलिसांनी तावरे अन् श्रीहरी यांची कसून चौकशी सुरु केली आहे. पोलीस चौकशीदरम्यान तावरेनं मोठं वक्तव्य केलेय. कारवाईदरम्यान डॉ.अजय तावरे यांनी पोलिसांना सांगितले की, 'मी शांत बसणार नाही. मी सर्वांची नावे घेईन' असा इशारा दिला आहे.

डॉ. अजय तावरे हे ससूनमध्ये फॉरेन्सीक लॅबचे प्रमुख आहेत. त्यांच्या फोनकॉलनंतरच आरोपीचा ब्लड रिपोर्ट बदलण्यात आल्याचं तपासात समोर आलेय. पोलीस चौकशीदरम्यान अजय तावरे यांनी मी गप्प बसणार नाही, सगळ्यांची नावं उघड करेन, असा गर्भित इशाराच दिलाय. तावरेच्या या इशाऱ्यानंतर पुण्यातील वातावरण तापलेय. डॉ. तावरे कोणाची नावे घेणार याकडे लक्ष लागले आहे. तावरेनी दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी अतुल घटककांबळे नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. त्याशिवाय त्यानेच या डॉक्टरला पैसे पुरवल्याचे समोर आले आहे. त्यांनी या प्रकरणात एका लोकप्रतिनिधीचेही नाव घेतले असून, तपास सुरू करण्यात आला आहे.

कल्याणीनगर कार दुर्घटनेतील अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आल्याचे पोलिसांना तपासात समोर आले आहे. सुरुवातीला पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस आणि प्रत्यक्षदर्शींना ‘मॅनेज’ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यानंतर ससून रुग्णालयातील डॉक्टरांना पैसे देऊन थेट रक्ताचे नमुने बदलून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कल्याणीनगर अपघातप्रकरणी पोलिसांकडून तपास अधिक वेगानं करण्यात येत आहे.

तो लोकप्रतिनिधी कोण?

कल्याणीनगर अपघातानंतर अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांनी डॉ. अजय तावरे यांच्याशी संपर्क साधला होता. त्यावेळी एका लोकप्रतिनिधीने अल्पवयीन आरोपीला मदत केल्याचे डॉक्टर तावरे यांना सांगितल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. हा लोकप्रतिनिधी कोण? याबाबत पोलिसांना विश्वसनीय माहिती मिळाली असली, तरी पोलीस नाव सांगण्यास नकार दिलाय. पोलिसांनी याप्रकरणी वेगानं तपास सुरु केलाय.

कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. ससूनच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर यांनी अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने डस्टबिनमध्ये टाकल्याचे पोलीस तपासात उघड झाले.

अजय तावरेला अटक कशी झाली?

ससून रुग्णालयातून पहिलाच रिपोर्ट अल्पवयीन आरोपीने नशा न केल्याचा आल्याने संशय बळावला. ११ वाजल्यानंतर आलेल्या प्राथमिक अहवालात अल्पवयीन आरोपीने नशा न केल्याचा रिपोर्ट आला. त्यानंतर पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने घेतले. खबरदारी म्हणून दुसरी वैद्यकीय तपासणी आणि डीएनए टेस्ट औंधमधल्या सरकारी रुग्णालयात करण्यात आली. औंधमधल्या सरकारी रुग्णालयात वडिलांचेही रक्ताचे नमुने पोहोचवण्यात आले. औंधमध्ये झालेल्या तपासणीत दुसऱ्यांदा घेतलेले रक्त आणि वडिलाचे डीएनए जुळल्याच समोर आलं मात्र पहिले रक्ताचे दुसऱ्याच व्यक्तीचे असल्याचेही समोर आलं.पोलिसांनी पाहिले रक्ताचे नमुने घेणाऱ्या डॉ श्रीहरी हळणोरला अटक केली. श्रीहरी हळणोरने पोलिसांच्या चौकशीत अजय तावरे यांच्या सांगण्यावरून रक्ताचे नमुने बदलले असल्याचे सांगितलंय.पुणे पोलिसांनी अखेर रात्री उशिरा दोघांना राहत्या घरातून अटक केलीय.

Share this article