Trainee IAS Pooja Khedkar News : प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर प्रकरणात आणखी एक अपडेट समोर आली आहे. वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या आयएएस पूजा खेडकर यांचं पिंपरी चिंचवड कनेक्शन समोर आलं आहे.
Trainee IAS Pooja Khedkar News : पुणे : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे एकानंतर अनेक कारनामे समोर येत आहेत. आपल्या खासगी कारवर अंबर दिवा लावून थाट आणि अधिकारी पदाचा रुबाब केल्यानंतर त्या चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. मात्र, पूजा खेडकर यांच्या आयएएस अधिकारी पदाच्या निवडीवरच आता अनेक शंका उपस्थित होत आहेत. कारण, अंपगत्वाचं प्रमाणपत्र दाखवून त्यांनी ही सनदी अधिकारीपदाची नोकरी मिळवली, पण ज्या महाविद्यालयातून त्यांनी एमबीबीएसपदाची पदवी मिळवली, त्या महाविद्यालयाकडे आपण शारिरीकदृष्ट्या फीट असल्याचं प्रमाणपत्र त्यांनीच दिलं असल्याचं उघडकीस आलं आहे. त्यातच, आता पिंपरी चिंचवड महापालिकेतून त्यांना पायातील अपंगत्वाचंही प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे, पूजा खेडकर यांचा पाय आणखी खोलात गेल्याचं दिसून येत आहे.
डाव्या गुडघ्यात 7 टक्के अपंगत्व
आयएएस पूजा खेडकर प्रकरणात आणखी एक अपडेट समोर आली आहे. वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या आयएएस पूजा खेडकर यांचं पिंपरी चिंचवड कनेक्शन समोर आलं आहे. येथील महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातून देखील त्यांनी अपंगत्वाचे प्रमाणपत्र घेतल्याचं समोर आलं आहे. डाव्या गुडघ्यात 7 टक्केवारीने त्या कायमस्वरूपी आधु असल्याचं या प्रमाणपत्रात नमूद करण्यात आलं आहे. 24 ऑगस्ट 2022 रोजी हे प्रमाणपत्र वायसीएम रुग्णालयाने पूजा खेडकरांना दिलं होतं. याआधी पूजा खेडकर यांना कमी दिसतं, त्याअनुषंगाने त्यांनी अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवल्याने त्या चर्चेत होत्या. अशातच आता डाव्या गुडघ्याच्या अपंगत्वाचे प्रमाणपत्र समोर आलेलं आहे. त्यामुळे, पूजा खेडकर यांच्या अपंगत्वाबाबतही संशय आणि शंका वाढल्या आहेत.
दरम्यान, पूजा खेडकर यांची पुणे जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यात प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. सध्या अकोला येथे त्यांना प्रकल्प अधिकारी म्हणून नेमण्यात आलं असून 19 जुलैपर्यंत त्यांना तेथील कार्यभार देण्यात आला आहे. दुसरीकडे त्यांच्यावरील आरोपांसाठी केंद्र सरकारने 1 सदस्यीय समिती नेमली असून त्यांच्या युपीएससी परीक्षेतील निवडींसदर्भाने चौकशी केली जात आहे.
एमबीबीएसला प्रवेश घेताना फीट
पुण्यातील श्रीमती काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयात 2007 मध्ये एमबीबीएसला प्रवेश घेतला होता. त्यावेळी सीईटीद्वारे तिला प्रवेश मिळाला होता. तिथे प्रवेश घेताना आपण पूर्णतः फीट असल्याचं, तसेच कोणताही आजार नसल्याचं सर्टिफिकेट त्यांनी सादर केलं होतं. विशेष म्हणजे त्यावेळी वडील दिलीप खेडकर हे क्लास वन अधिकारी असताना देखील त्यांनी ओबीसी कोट्यातून प्रवेश घेत नॉन क्रिमीलियर सर्टिफिकेट देखील सादर केलं होतं. त्यांचे नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट हे नगरचे एसडीओ यांचे आहे, अशी माहिती समोर आली आहे.
आणखी वाचा :