पुण्यातील १४ पबवर उत्पादन शुल्क विभागाने केली कारवाई

पुण्यातील बाॅलर पबसह १४ पब, बारवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कारवाई केली. उत्पादन शुल्क विभागाने मुंढवा, कल्याणीनगर आणि कोरेगाव पार्क भागातील पब आणि बारवर कारवाई सुरू केल्याने या भागात शुकशुकाट असल्याचे दिसून येत आहे.

 

Rameshwar Gavhane | Published : May 26, 2024 12:49 PM IST / Updated: May 26 2024, 06:20 PM IST

कल्याणी नगर भागात गेल्या रविवारी पोर्शे गाडीच्या झालेल्या भीषण अपघातानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने आठवडाभरात शहरातील वेगवेगळ्या भागात असलेल्या पब आणि बारवर कारवाई करून सील केले. शनिवारी रात्री उत्पादन शुल्क विभागाने कल्याणीनगर, मुंढवा भागातील १४ पब, बारवर कारवाई केली. बाॅलर पबवर देखील जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक वसंत कौसडीकर यांच्यासह पथकाने ही कारवाई केली. मद्य विक्री नियमावलीचे, एक्साईज रजिस्टरमध्ये नोंदी योग्य नसल्याने या पबवर कारवाई करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंह रजपूत यांनी दिली. कल्याणीनगर, मुंढवा, कोरेगाव पार्क, बाणेर-बालेवाडी भागातील पब, बारविरोधात कारवाई करण्यात आली. शनिवारी रात्री तरुणाईची या भागात गर्दी असते. एकाच वेळी १४ पब, बारविरोधात कारवाई करून त्यांना सील करण्यात आल्याने या भागात शुकशुकाट असल्याचे दिसून आले.

'मद्य विक्री नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील पब, बार, रेस्टॉरंट आणि रूफ हाॅटेल्सविरोधात कारवाई करण्यात आली आहे. आठवडभरात ५४ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. परवाना निलंबित केल्यानंतर संबंधित बार, पब सील करण्यात आले आहेत', अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंह रजपूत यांनी दिली आहे.

आणखी वाचा: 

नाशिकमध्ये सुराणा ज्वेलर्सवर छापा, 26 कोटी रोख रक्कम आणि 90 कोटीची बेहिशेबी मालमत्ता जप्त

 

 

Share this article