
Pregnant Woman and Baby Die After 6 km Walk to Hospital : स्वातंत्र्याच्या अमृतकाळानंतरही दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्थेचे विदारक वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात रस्ते आणि आरोग्य सुविधांच्या अभावामुळे एका २४ वर्षीय गरोदर महिलेला आपला प्राण गमवावा लागला. गावात प्रसूतीची सोय नसल्याने जंगलातून तब्बल ६ किलोमीटरची पायपीट करावी लागल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
एटापल्ली तालुक्यातील 'आलदंडी टोला' येथील रहिवासी असलेल्या आशा संतोष कीरंगा (वय २४) या नऊ महिन्यांच्या गरोदर होत्या. त्यांचे गाव मुख्य रस्त्यापासून पूर्णपणे तुटलेले असून तिथे प्राथमिक आरोग्य केंद्राची किंवा प्रसूतीची कोणतीही सोय नाही. सुरक्षित प्रसूती व्हावी आणि वेळेवर वैद्यकीय मदत मिळावी, या आशेने आशा यांनी १ जानेवारी रोजी आपल्या पतीसह जंगलातील अवघड वाटेने पायपीट सुरू केली. ६ किलोमीटर चालून त्या पेठा येथील आपल्या बहिणीच्या घरी पोहोचल्या. मात्र, गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात केलेल्या या शारीरिक कष्टाचा त्यांच्या शरीरावर गंभीर परिणाम झाला.
२ जानेवारीच्या सकाळी आशा यांना तीव्र प्रसूती कळा सुरू झाल्या. त्यांना तातडीने रुग्णवाहिकेने हेदरी येथील काली अम्माल रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी तातडीने सिझेरियन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. मात्र, तोपर्यंत परिस्थिती हाताबाहेर गेली होती. गर्भातील बाळाचा मृत्यू झाला होता आणि काही वेळातच वाढलेल्या रक्तदाबामुळे आशा यांनीही अखेरचा श्वास घेतला.
या घटनेनंतर जिल्हा प्रशासनावर टीकेची झोड उठत आहे. गडचिरोलीचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर महिलेची नोंदणी आशा स्वयंसेविकांकडे करण्यात आली होती. पायपीट केल्यामुळेच प्रसूतीमध्ये गुंतागुंत निर्माण झाली असावी, असा प्राथमिक अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागवण्यात आला असून या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ही घटना केवळ एका महिलेचा मृत्यू नसून दुर्गम भागातील विकासाच्या दाव्यांची पोलखोल करणारी आहे. आजही गडचिरोलीच्या अनेक गावांमध्ये रस्ते नाहीत, पावसाळ्यात संपर्क तुटतो आणि साध्या उपचारांसाठीही मैलोन्मैल पायपीट करावी लागते. आशा कीरंगा यांचा मृत्यू हा व्यवस्थेच्या दुर्लक्षामुळे झालेला बळी असल्याची भावना स्थानिकांमध्ये व्यक्त होत आहे.