
पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात बारामतीचा धूर कधीच थांबत नाही, पण यावेळी फडणवीसांनी एक असा डाव टाकला आहे, ज्याने काका-पुतण्यांवर म्हणजेच शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर एकाचवेळी शह दिला आहे. इंदापूरचे नामवंत उद्योजक आणि राजकीयदृष्ट्या प्रभावशाली व्यक्तिमत्त्व असलेले प्रवीण भैय्या माने यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. मुंबईत भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि ज्येष्ठ नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत माने यांनी भाजपमध्ये प्रवेश करत, एकप्रकारे बारामतीच्या गणितांमध्ये नवा वळण आणला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांनी प्रेरित होऊन भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे माने यांनी सांगितले. मात्र, हा प्रवेश काही तात्काळ भावनेतून घेतलेला निर्णय नव्हता. गेल्या काही वर्षांपासून माने आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्तपणे बैठकांचा सिलसिला सुरू होता. त्यामुळे त्यांच्या प्रवेशाची पार्श्वभूमी आधीच तयार होती.
प्रवीण माने हे पूर्वी एकत्रित राष्ट्रवादीचे सक्रिय नेते होते. मात्र पक्षात फूट पडल्यानंतर ते दोन्ही गटांपासून हळूहळू दूर झाले. २०२४ मध्ये शरद पवारांच्या गटाने त्यांना उमेदवारी नाकारत हर्षवर्धन पाटील यांना तिकीट दिलं. त्यानंतर माने यांनी अपक्ष उमेदवार म्हणून इंदापूर विधानसभा लढवली आणि तब्बल ४०,००० मते मिळवून मोठा प्रभाव दाखवून दिला.
“A for Amethi, B for Baramati” ही भाजपची घोषणा सर्वश्रुत होती. अमेठी जिंकली, पण बारामती अद्याप दूर. मात्र आता माने यांच्या प्रवेशाने भाजपला एक हक्काचा स्थानिक चेहरा मिळाला आहे, जो शरद-अजित पवारांना टक्कर देण्यास सक्षम आहे. इंदापूरमध्ये प्रभाव असलेले प्रवीण माने, बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपसाठी नवा "Game Changer" ठरू शकतात. आगामी निवडणुकांमध्ये दत्तामामा भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्यासारख्या विरोधकांसमोर माने हे भाजपचे चेहरा ठरल्यास गणित पूर्णपणे उलटू शकते.
प्रवीण माने यांचा भाजपमध्ये प्रवेश म्हणजे केवळ पक्षांतरण नाही, तर हा राजकीय शक्तिसमीकरणात मोठा झटका आहे. विशेषतः पवार कुटुंबीयांसाठी. फडणवीसांचा हा डाव, बारामतीवर भाजपचे लक्ष केंद्रित असल्याचे पुन्हा अधोरेखित करतो.