
अमरावतीच्या सायन्स कोअर मैदानावर २१ आणि २२ एप्रिल रोजी नवनीत राणा यांच्या सभेसाठी परवानगी देण्यात आली होती. तर बच्चू कडू यांना २३ आणि २४ एप्रिलसाठी परवानगी मिळाली होती. त्यासाठी रितसर पैसेही भरण्यात आले होते. मात्र ऐकवेळी अमित शहांच्या दौऱ्यात बदल झाला आणि २४ एप्रिलला सभा घेण्याचे निश्चित केले. परंतु ठरल्याप्रमाणे उद्या सभा होणार म्हणून बच्चू कडू मैदानावर सभेची तयारी पाहायला गेले असता त्यांना पोलिसांनी मैदानावर येऊ दिले नाही. यामुळे आता अमरावतीती नवीन वादाला तोंड फुटले आहे.
दरम्यान मैदानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी सभा घेणार असल्यामुळे बच्चू कडू यांना नियमानुसार दिलेली परवानगी सुरक्षेचे कारण देऊन रद्द करण्यात आली आणि त्यानंतर या मैदानावर आता अमित शाह यांची सभा होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. यानंतर बच्चू कडू यांनी त्या ठिकाणी आंदोलन सुरू केले आहे. यामध्ये अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी ठिय्या देऊन बसले आहेत.
निवडणूक अधिकाऱ्यांचे परवानगीचे आदेश असताना :
या मैदानासाठी बच्चू कडू यांना देण्यात आलेल्या परवानगीमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट म्हंटले आहे की, 23 आणि 24 तारखेला साडेचार वाजेपर्यंत हे मैदान दिनेश बुब यांना देण्यात येत असून तोपर्यंत या मैदानावर अन्य कुठल्याही पक्षाचा अथवा अन्य कुणाचा प्रवेश होता कामा नये.तरीही असं असताना या मैदानात भाजपा कशा पद्धतीनं मंडप उभारू शकतं आणि पोलीस त्यांना का उभारू देताय? असा सवाल कडू यांनी उपस्थित केला. सरकारी यंत्रणेचा गैरवापर आणि तानाशाही सत्ताधारी पक्ष करत आहे.हे आम्ही बिलकुल खपवून घेणार नसल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले.
आयोगाने दिलेले परवानगी पत्र बच्चू कडूंनी फाडले :
पोलीस समजावून सांगत आहेत पण परवानगी असूनही आम्ही का मैदानात येऊ शकत नाही आणि इथे भाजपाची सभा कशी होत आहे. रीतसर मैदान आमच्या ताब्यात असून देखील पोलिसच आमचं ऐकून नसतील तर या परवानगीच करू करू म्हणून बच्चू कडूंनी निवडणूक आयोगाने दिलेलं परवानगी पत्र पोलिसांमसमोरच फाडले. तसेच भाजपाच्या सांगण्यावरून पोलीस काम करत असून आम्हाला मैदानाबाहेर काढले जात आहे, असाही आरोप बच्चू कडू यांनी केला.