Nasrapur Case : नसरापूर अत्याचार-हत्या प्रकरणातील आरोपी दोषी; फाशीची शिक्षा देण्याची वडीलांची मागणी

Published : Jun 25, 2026, 12:46 PM IST
Nasrapur Case Verdict

सार

Nasrapur Case : नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपी भीमराव कांबळेला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. भीमराव कांबळेवरील सर्व आरोप सिद्ध झाले आहेत.  

Nasrapur Case : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे महाराष्ट्र दिनी साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करण्यात आले. यानंतर तिची हत्या केली. या प्रकरणात आरोपी भीमराव कांबळेला अटक करण्यात आली होती. आज आरोपी भीमराव कांबळे विरोधात खटल्याची सुनावणी होणार होती. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या पावणेदोन महिन्यांत या खटल्याची सुनावणी पूर्ण होत निकाल लागला आहे. महाराष्ट्रातील न्यायालयीन इतिहासातील हा सर्वात वेगवान खटल्यांपैकी एक ठरला आहे.

सर्व आरोप सिद्ध

पुणे जिल्हा सत्र न्यायालयातील विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी या प्रकरणाचा निकाल दिला. यावेळी आरोपीविरुद्ध दाखल करण्यात आलेले सर्व आरोप सिद्ध झाल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणातील काही कलमांमध्ये फाशीची, काही कलमांमध्ये जन्मठेप आणि दीर्घ कारावासाची तरतूद आहे. आरोपीला येत्या 29 जूनला शिक्षा सुनावली जाणार आहे. 

न्यायालयात आरोपीचा बनाव

निकालाच्या सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी आरोपीला घडलेला प्रसंग आठवण्यास सांगितले. याशिवाय स्वतःला कोणती शिक्षा द्यावी असे वाटते, असा प्रश्नही विचारला. यावेळी आरोपीने आपण मुलीला खाऊ आणण्यासाठी घेऊन गेलो होतो. यावेळी चिमुरडीचा पाय घसरल्याने ती जखमी झाली असे आरोपीने म्हटले. यावेळी न्यायाशीधांनी आरोपीला खडेबोल सुनावले. तुझ्यावरील गुन्हा सिद्ध झाल्याचेही न्यायाधीशांनी स्पष्ट केले.  

शासकीय पक्षाचा युक्तिवाद

शासकीय वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद करत आरोपीला कोणताही पश्चाताप नसल्याचे नमूद केले. चिमुरडीवर अमानुष अत्याचार करण्यात आले. वैद्यकीय तपासणीत अनेक गंभीर जखमा आणि लैंगिक अत्याचाराचे पुरावे समोर आले. समाजात महिलांमध्ये आणि मुलींमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा आवश्यक आहे. यामुळे आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली. 

आरोपी सुधारण्याच्या पलीकडे

शासकीय पक्षाने आरोपीचा पूर्वीचा गुन्हेगारी इतिहासही न्यायालयासमोर मांडला. आरोपीला यापूर्वी सुधारण्याच्या संधी मिळाल्या होत्या, मात्र त्यातून कोणताही बदल झालेला नाही. आरोपीचे कुटुंबीयदेखील त्याच्या समर्थनासाठी पुढे आले नाहीत. सदर गुन्हेगार समाजासाठी धोकादायक असल्याचा दावा वकिलांनी केला.

बचाव पक्षाची बाजू

दुसरीकडे, बचाव पक्षाने आरोपीचे वय ६५ वर्षे असल्याचा मुद्दा उपस्थित केला. तसेच घटनाक्रमातील काही बाबींमध्ये विसंगती असल्याचे म्हटले. यामुळे आरोपीला फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली.

'इन कॅमेरा' सुनावणी

प्रकरण संवेदनशील असल्यामुळे संपूर्ण सुनावणी बंद दाराआड (इन कॅमेरा) पार पडली. या खटल्यात 55 हून अधिक साक्षीदारांचे जबाब, डीएनए अहवाल, वैद्यकीय पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात आले. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या 15 दिवसांत पोलिसांनी 1200 पानी आरोपपत्र दाखल केले होते.

नेमके प्रकरण काय?

1 मे रोजी नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर राज्यभरातून संतापाची लाट उसळली होती. पुणे ग्रामीण पोलिसांनी विशेष तपास पथक स्थापन करून तपास सुरू केला. तपासादरम्यान प्रत्यक्षदर्शींची साक्ष, डीएनए आणि न्यायवैद्यकीय अहवालांच्या आधारे आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करण्यात आले.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Maharashtra Rain Update : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भाला ऑरेंज अलर्ट, मुंबईतही जोरदार बरसणार सरी
या तारखेला होणार मुसळधार पाऊस, पंजाबराव डख काय म्हणाले?