Trimbakeshwar News : त्र्यंबकेश्वर येथे तलावात कपडे धुण्यासाठी गेलेल्या 2 मुलींचा बुडून मृत्यू

Trimbakeshwar News : त्र्यंबकेश्वर येथील बिल्व तीर्थ तलावावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन तरुणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. यामुळे त्र्यंबकसह तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

 

Trimbakeshwar News : त्र्यंबक नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरात तीन दिवसानंतर पाणीपुरवठा केला जातो. अनियमित आणि अपुरा पाणीपुरवठा केला जात असल्यामुळे त्र्यंबकवासियांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. मात्र त्र्यंबकेश्वर येथील बिल तीर्थ तलाव हा मागील दोन वर्षांपासून गाळ आणि मुरूम काढून खोल केला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या पाण्यात कपडे धुण्यासाठी त्र्यंबक शहरातील नागरिक जात असतात. आज दुपारच्या सुमारास त्र्यंबकेश्वर येथील 13 वर्षीय दोन मुली बिल्व तीर्थ तलावात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. कपडे धुत असताना एक मुलगी पाण्यात पडली आणि तिला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी गेली असता दोघींचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे त्र्यंबकेश्वर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्र्यंबकेश्वर येथे पाणीपुरवठा वेळेत होत नसल्याने नागरिक पाण्यासाठी जीव धोक्यात घालत असतात. पाण्यामुळे या दोघींचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

बिल्व तीर्थावर याआधीही मृत्यूच्या घटना

यापूर्वी देखील बिल्व तीर्थवर अपघाती मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने या तलावाकडे योग्य ती प्रतिबंधक उपाययोजना करावी अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते विलास कोरडे यांनी केली आहे. तर सध्या त्र्यंबकेश्वरमध्ये दोन दिवसाआड पाणी येत असल्याने येथील लोकांना पुरेसे पिण्याचे पाणी देखील मिळत नाही. त्यामुळे पिण्यासाठी पुरेसे पाणी नाही मग वापरण्यासाठी कुठून आणणार? असा प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत.

आणखी वाचा:

Monsoon Update 2024: दक्षिण कोकणातच मान्सूनचा मुक्काम, राज्यात काही जिल्ह्यांत यलो अलर्ट

Share this article