Nashik Earthquake : नाशिकमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के, शनिवारनंतर रविवारीही हादरे; शहरात भीतीचं वातावरण

Published : Aug 09, 2026, 09:23 AM IST
Nashik Earthquake

सार

Earthquake in Nashik : नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के बसले असून या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. शनिवारी ४.३ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्यानंतर रविवारी मध्यरात्री आणि पहाटेदेखील हादरे जाणवले.

नाशिक : नाशिकमध्ये रविवारी मध्यरात्रीपासून पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास धक्के जाणवले होते. त्यानंतर आज रविवारी मध्यरात्रीही भूकंपाचे हादरे बसले. या घटनेने शहरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. दिंडोरी, सुरगाणा, कळवण, चांदवड, पेठ, निफाडसह नाशिक शहरासह तालुक्यात हादरे बसले. शनिवारी ४.३ रिश्टर स्केल इतकी या भूकंपाची तीव्रता होती. भूकंपाची खोली ५ किलोमीटर होती.

शहरात शनिवार, रविवारीही भूकंपाचे हादरे

शनिवारी ८ ऑगस्ट रोजी भूकंप झाल्यानंतर रविवारी ९ ऑगस्टच्या मध्यरात्रीही भूकंपाचे हादरे बसले आहेत. रविवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ३.१ रिश्टर स्केलचा हादरा बसला. त्यानंतर पावणे दोन वाजता २.९ रिश्टर स्केल आणि पुन्हा सकाळी साडेपाच वाजता ३.३ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का नाशिक शहरात बसला आहे.

दोन आठवड्यांमध्ये २२ वेळा भूकंपाचे धक्के

महत्त्वाची बाब म्हणजे मागील जवळपास दोन आठवड्यांमध्ये अनेकदा शहरात भूकंपाचे हादरे बसले आहेत. २५ जुलैपासून ८ ऑगस्टपर्यंत या दोन आठवड्यांमध्ये आतापर्यंत २२ वेळा भूकंपाचे धक्के नाशिकमध्ये बसले आहे.

भूकंपामुळे कुठेही जीवितहानी नाही

नाशिक शहरातील विविध भागात बसलेल्या भूकंपाच्या हादऱ्यांनी नागरिकांच्या घरातील भांडी, तसंच इतर साहित्य जमिनीवर पडल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीती पसरली आहे. महत्त्वाचं म्हणजे या हादऱ्यांमुळे कुठेही जीवितहानी झालेली नाही. कच्ची किंवा दगड-मातीच्या घरात राहणाऱ्या नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसंच गरज पडल्यास नागरिकांनी तलाठी, तहसील कार्यालय किंवा ग्रामपंचायत कार्यालयात, नगरपालिका किंवा महानगरपालिकेशी संपर्क करण्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

नागरिकांना सतर्कतेचं, अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन

या परिस्थितीनंतर नाशिक जिल्हाधिकाऱ्यांकडून नागरिकांना घाबरू नका असं आवाहन केलं जात आहे. तसंच अफवांवर विश्वास ठेवू नका, मात्र सतर्क राहा. सोशल मीडियावरील कोणतेही मेसेज खात्रीशिवाय पुढे पाठवू नका, असं आवाहनही करण्यात आलं आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Uddhav Thackeray: 'गद्दारांना' भेटणाऱ्या मोदींवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले - न्यायव्यवस्थेवर दबाव आणण्याचा प्रयत्न?
Gen Z: 'या पिढीने सरकारला गुडघ्यावर आणलं', उद्धव ठाकरेंचा केंद्रावर हल्लाबोल