Nagpur Robbery : नागपुरात फिल्मी स्टाईल दरोडा! SBI बँकेत मिरचीपूड फेकून ४ लाखांची लूट, पुढे काय झालं?

Published : Sep 11, 2026, 03:22 PM IST
Nagpur Robbery : नागपुरात फिल्मी स्टाईल दरोडा! SBI बँकेत मिरचीपूड फेकून ४ लाखांची लूट, पुढे काय झालं?

सार

महाराष्ट्राच्या नागपूर शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) शाखेत एकच खळबळ उडाली. एका व्यक्तीने बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून तब्बल ४ लाख रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला.

मुंबई : गुरुवारी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास नागपूरमधील स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) एका शाखेत एक धक्कादायक घटना घडली. बँकेतील कर्मचारी नेहमीप्रमाणे आपलं काम करत होते, तेव्हा एक व्यक्ती ग्राहक बनून बँकेत शिरला आणि त्याने थेट कॅश काऊंटर गाठलं.

या व्यक्तीने अचानक आपल्याजवळ लपवून आणलेली मिरचीपूड काढली आणि बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात फेकली. यामुळे कर्मचाऱ्यांची काही क्षणांसाठी अक्षरशः त्रेधातिरपीट उडाली. त्यांना काही कळण्याच्या आतच डोळ्यांची जळजळ सुरू झाली आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं.

या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. यामध्ये आरोपीने लाल रंगाचा कुर्ता आणि काळी पायजमा घातल्याचं दिसतंय. त्याने आपला चेहरा पूर्णपणे झाकला होता. तो मिरचीपूड फेकत असताना दोन-तीन कर्मचारी जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावत सुटले, तर हा मास्क घातलेला चोरटा त्यांचा पाठलाग करताना दिसतोय.

याच गोंधळाचा फायदा घेत आरोपीने कॅश काऊंटरवर आपला मोर्चा वळवला. त्याने काऊंटरवरील ४ लाख रुपयांची रोकड उचलली आणि बँकेतून पळ काढला.Maकाही बँक कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकाने चोराचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गर्दीचा फायदा घेत तो काही क्षणांतच नजरेआड झाला.

बँक अधिकाऱ्यांनी तात्काळ स्थानिक पोलीस स्टेशनला या दरोड्याची माहिती दिली. पोलिसांनी बँकेच्या आत आणि बाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज तपासण्यास सुरुवात केली.या फुटेजच्या मदतीने पोलिसांनी आरोपीचा चेहरा आणि पळून जाण्याचा मार्ग ओळखला. त्यानंतर पोलिसांनी परिसरात नाकाबंदी केली आणि गस्तीवर असलेल्या पथकांना सतर्क केलं.

पोलिसांच्या या कारवाईला अवघ्या ३० मिनिटांत यश आलं. आरोपी जास्त दूर जाण्याआधीच पोलिसांनी त्याला यशस्वीरित्या शोधून काढलं आणि ताब्यात घेतलं.आरोपीची झडती घेतली असता, त्याच्याकडून बँकेतून चोरलेली संपूर्ण ४ लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे.आरोपीला अटक करण्यात आली असून पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Marbat Festival : नागपूरच्या मारबत उत्सवाची धूम, नक्की काय आहे यामागील कथा? घ्या जाणून
Madhuri Elephant : अखेर माधुरी हत्तीण कोल्हापुरात परतणार, पण 'वंतारा'ची साथ कायम राहणार!