
मुंबई : कोकणच्या सागरी प्रवासाचा नवा अध्याय आजपासून (१ मार्च) सुरू झाला आहे. मुंबई ते विजयदुर्ग दरम्यानची बहुप्रतिक्षित रो-पॅक्स फेरी सेवा अखेर प्रवाशांच्या सेवेत रुजू झाली आहे. विशेष म्हणजे, आशियातील ही सर्वात वेगवान रो-रो फेरी सेवा मानली जात असून, मुंबईहून विजयदुर्गला पोहोचण्यासाठी आता अवघे ७ तास लागणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सुविधेला शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्र सागरी मंडळाने 'एमटूएम फेरीज'च्या (M2M Ferries) माध्यमातून ही सेवा सुरू केली आहे. याचे नियोजन खालीलप्रमाणे असेल.
मुंबई ते विजयदुर्ग: दर बुधवारी आणि शनिवारी सकाळी ८.०० वाजता मुंबईहून (भाऊचा धक्का) प्रस्थान, दुपारी ३.०० वाजता विजयदुर्गला पोहोचणार.
विजयदुर्ग ते मुंबई: दर गुरुवारी आणि रविवारी दुपारी १.०० वाजता विजयदुर्गहून प्रस्थान, सायंकाळी ७.०० वाजता मुंबईत आगमन.
प्रवाशांच्या सोयीसाठी विविध श्रेणींनुसार तिकीट दर निश्चित करण्यात आले आहेत.
प्रवासी (इकॉनॉमी): २,५०० रुपये
प्रवासी (प्रीमियम इकॉनॉमी): ४,००० रुपये
चारचाकी गाडी (Car): ६,००० रुपये
दुचाकी (Bike): १,००० रुपये
सायकल: ६०० रुपये
या सेवेची क्रेझ किती आहे, हे पहिल्याच दिवशी दिसून आले. ६२५ प्रवासी क्षमतेच्या या बोटीसाठी शनिवारी रात्रीपर्यंत ४५० हून अधिक तिकिटांची विक्री झाली होती. रस्ते मार्गावरील ट्रॅफिक आणि थकवा टाळून आरामात गाडीसह प्रवास करण्यासाठी ही सेवा पर्यकांसाठी पर्वणीच ठरणार आहे.