
Missing Link Accident : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘मिसिंग लिंक’ परिसरात शुक्रवारी भीषण अपघाताची घटना घडली. बसने तीन खासगी वाहनांना दिलेल्या जोरदार धडकेत तिघांचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर प्रवासाचा वेग वाढला असला तरी अतिवेग आणि निष्काळजीपणामुळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मुंबई-पुणे महामार्गावर भरधाव बसने तीन खासगी वाहनांना जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की, काही वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला. या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. त्यापैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.
अपघातानंतर काही वाहनांमध्ये नागरिक अडकून पडले होते. हेल्प फाउंडेशनच्या बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत गॅस कटरच्या सहाय्याने अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. बचावकार्यामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
मिसिंग लिंक परिसरात अवघ्या चार तासांच्या अंतरात दोन अपघात घडल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अपघातग्रस्त वाहने हटवण्यासाठी पोलिस आणि प्रशासनाला मोठी कसरत करावी लागली. काही वेळानंतर चारही लेन वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पर्यायी लेनवरून वाहने सोडण्यात आली होती.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ कमी झाला असला तरी सुरक्षेच्या दृष्टीने अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. अतिवेग, लेन बदलताना होणारी निष्काळजीपणा आणि वाहनांवरील नियंत्रण सुटणे या कारणांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची चर्चा सुरू आहे. पोलिसांकडून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू असून मृतांची ओळख पटवण्याचे प्रयत्नही सुरू आहेत.