MPSC औषध निरीक्षक भरती परीक्षेचा पेपर फुटल्याचा दावा; रोहित पवारांचे गंभीर आरोप, CBI चौकशीची मागणी

Published : Jul 27, 2026, 01:51 PM IST
rohit pawar

सार

MPSC च्या औषध निरीक्षक भरती परीक्षेचा पेपर फुटल्याचा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. तसेच परीक्षेच्या दोन दिवस आधी प्रश्नपत्रिका उमेदवारांपर्यंत पोहोचल्याचा दावाही केला आहे.

मुंबई : नीट पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरात परीक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. अशातच आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक (Drug Inspector) भरती परीक्षेबाबत मोठा वाद समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी या भरती परीक्षेचा पेपर फुटल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच दोषींवर तातडीने गुन्हा दाखल करून फॉरेन्सिक तपास करण्याचीही त्यांनी मागणी केली आहे.

पेपरफुटीचा दावा

रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, २९ जुलै २०२५ रोजी औषध निरीक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर २२ मार्च २०२६ रोजी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला सुमारे ४४,५०० उमेदवार बसले होते. १२ जून २०२६ रोजी निकाल जाहीर करण्यात आला. मात्र परीक्षेच्या दोन दिवस आधी म्हणजे २० मार्च रोजी काही उमेदवारांच्या मोबाईलवर प्रश्नपत्रिकेची पीडीएफ पाठवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

‘१०० पैकी ९० प्रश्न आधीच मिळाले होते’

रोहित पवार यांच्या म्हणण्यानुसार, पैसे भरलेल्या उमेदवारांनाच प्रश्नपत्रिका पाठवण्यात आली होती. मुख्य प्रश्नपत्रिकेतील १०० पैकी तब्बल ९० प्रश्न हे आधीच उपलब्ध झाल्याचा त्यांनी आरोप केला. या प्रकरणात नंदुरबारमधील एका खासगी अकॅडमीचाही सहभाग असल्याचा दावा त्यांनी केला.

'पेपरफुटीसाठी १२ लाख रुपये घेतले'

या गैरप्रकारासाठी प्रत्येकी १२ लाख रुपये घेतल्याचा गंभीर आरोपही रोहित पवार यांनी केला. तसेच काही उमेदवारांनी २१ जुलै रोजी MPSC कडे याबाबत लेखी तक्रार केली होती. पण आयोगाने अद्याप कोणतीही स्पष्ट भूमिका घेतली नसल्याचे त्यांनी सांगितले. उलट तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिकाऱ्यांकडून धमकावले जात असल्याचाही आरोप त्यांनी केला.

CBI चौकशीची मागणी

या संपूर्ण प्रकरणाची एफआयआर दाखल करून फॉरेन्सिक तपास आणि सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी रोहित पवार यांनी केली. तसेच १० दिवसांत MPSC ने स्पष्टीकरण दिले नाही किंवा तपास न करता निकाल अंतिम केल्यास मुंबई किंवा पुण्यात मोठे आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम! घाटमाथ्यांना ऑरेंज, अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट; पुढील 12 तास महत्त्वाचे
Maharashtra Monsoon: कोकणात मुसळधार पाऊस पडणार, या भागाला दिला सतर्कतेचा इशारा