
मीरा-भाईंदर : भोपाळमधील त्या प्रसिद्ध '९० डिग्री' वळणाच्या पुलाची चर्चा अजून थांबली नाही, तोवर महाराष्ट्रातील मीरा-भाईंदरमध्ये इंजिनीअरिंगचा एक असा 'अनोखा' नमुना समोर आला आहे, जो पाहून डोकं खाजवल्याशिवाय पर्याय उरणार नाही. MMRDA ने बांधलेला एक भव्य चारपदरी पूल अचानक अर्ध्यावरच दोनपदरी झाला आहे. या अजब प्रकारामुळे सार्वजनिक पैशांची कशी उधळपट्टी होते, याचा जिवंत पुरावाच समोर आला आहे.
MMRDA ने मीरा-भाईंदर परिसरात वाहतूक कोंडी फोडण्यासाठी तीन दुमजली उड्डाणपूल बांधले आहेत. यातील एका पुलाचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. हा पूल सुरु होताना तर डामडौलात चारपदरी (4 Lane) दिसतो, पण काही अंतर पुढे जाताच तो अचानक आकुंचन पावून दोनपदरी (2 Lane) होतो.
तज्ज्ञांच्या मते: "एखादा हायवे अचानक अरुंद गल्ली व्हावा, तसाच काहीसा हा प्रकार आहे. यामुळे वाहतूक सुरळीत होण्याऐवजी तिथे 'बॉटलनेक' तयार होऊन भीषण कोंडी होण्याची शक्यता जास्त आहे."
हा पूल बांधण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. अचानक पूल अरुंद केल्यामुळे मूळ प्लॅनिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, जवळपास १०० कोटी रुपयांचा निधी वाया गेल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. नियोजनाचा अभाव की तांत्रिक चूक? यावरून आता MMRDA च्या कारभारावर टीकेची झोड उठत आहे.
या पुलाचे ड्रोन शॉट्स व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी MMRDA ला चांगलेच धारेवर धरले आहे.
"हा पूल आहे की 'नॅरो' फॅशन शोचा रॅम्प?"
"पूल बांधताना इंजिनीअर नक्की काय विचार करत होते?"
"जनतेचा पैसा असा पाण्यात जाताना पाहून दुःख होतंय."
अशा तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. एमएमआरडीए आता यावर काय स्पष्टीकरण देणार, की हा पूल असाच 'अर्धवट' अवस्थेत लोकांच्या माथी मारला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.