
Maharashtra weather update : राज्यात सध्या वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल पाहायला मिळत आहे. सकाळी कडाक्याची थंडी तर दुपारी कडक ऊन अशी स्थिती अनेक भागांत अनुभवायला मिळते. काही राज्यांमध्ये अजूनही पावसाचा जोर कायम आहे. उत्तर भारतात थंडी वाढत असल्याने महाराष्ट्रात शीतलहरी सक्रिय होत असून तापमानात सातत्याने घट होताना दिसत आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, राज्यात लवकरच गुलाबी थंडीचा अनुभव येण्याची शक्यता आहे.
जवळपास संपूर्ण डिसेंबर महिन्यात राज्यात थंडी कायम राहिली आहे. विशेष म्हणजे नोव्हेंबरच्या सुरुवातीला राज्यात पावसाने हजेरी लावली होती, तर दिवाळीच्या काळातही अनेक भागांत पावसाचे वातावरण होते. त्यामुळे यंदा हिवाळा आणि पावसाचा काळ एकमेकांत मिसळलेला पाहायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, राज्यात पुन्हा एकदा थंडी वाढण्याचे स्पष्ट संकेत आहेत.
राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान झपाट्याने खाली घसरले आहे. परभणी येथे किमान तापमान 6.3 अंश सेल्सिअस, निफाड आणि धुळे येथे 7.3 अंश सेल्सिअस, अहिल्यानगरमध्ये 7.7 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले आहे. भंडारा, नाशिक, नागपूर, जेऊर आणि यवतमाळ येथे किमान तापमान 10 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. उत्तर भारतातील पंजाबच्या हिस्सार येथे देशातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली असून तेथे 2.1 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे.
भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी राज्यात कडाक्याच्या थंडीचा इशारा दिला आहे. उत्तर भारतात गारठा वाढत असल्यामुळे त्या भागातून येणाऱ्या शीतलहरी महाराष्ट्रात अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पहाटे आणि रात्रीच्या वेळी नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
डिसेंबर महिना संपत आला असतानाही देशातील काही भागांत मुसळधार पाऊस सुरूच आहे. भारतीय हवामान विभागाने 31 डिसेंबर 2025 रोजी उत्तर भारतातील पाच राज्यांना पावसाचा मोठा इशारा दिला आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये 31 डिसेंबरच्या संध्याकाळपासून हवामान बिघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुढील तीन दिवसांत तामिळनाडूच्या अनेक भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागपट्टणम, तंजावर, मायिलादुथुराई आणि पुदुकोट्टई जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. केरळमध्येही काही भागांत पावसाची शक्यता असून, तामिळनाडू आणि केरळच्या काही भागांत सध्या सातत्याने पाऊस पडताना दिसत आहे. देशभरात वेगवेगळ्या भागांत वेगवेगळे हवामान अनुभवायला मिळत आहे.