
मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने आपला जोर कायम ठेवला आहे आणि आगामी १० ऑगस्ट, रविवारीही काही भागात पावसाचा तडाखा जाणवणार आहे. हवामान विभागाने राज्यातील १५ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यासाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. ठाणे, पालघर, रायगड आणि सिंधुदुर्गमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये ढगाळ हवामान असून हलका ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज आहे. कमाल तापमान ३०°C तर किमान तापमान २६°C इतकं राहू शकतं.
कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. पुण्यात ढगाळ आकाश आणि हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.
नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहिल्यानगरमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. या भागात पावसाचे प्रमाण कमी असले तरी अचानक मुसळधार पावसाची शक्यता नाकारता येत नाही.
लातूर, धाराशिव, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड या ६ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. जालना आणि छत्रपती संभाजीनगर सध्या यापासून वगळले गेले असले तरी हवामानात झपाट्याने बदल होऊ शकतो.
बुलढाणा, अकोला, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांनाही हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. या भागात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस राज्यभर पावसाचा जोर सुरूच राहणार आहे. शेतकरी, वाहनचालक आणि नागरिकांनी हवामान बदलाची माहिती नियमितपणे तपासून आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.