
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) ने ओबीसी समाजात जनजागृती करण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेतली आहे. ‘मंडल यात्रा’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या अभियानाला आजपासून अधिकृत सुरुवात झाली असून, पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी हिरवा झेंडा दाखवत यात्रेचा शुभारंभ केला.
ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापुरकर यांच्या नेतृत्वात ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रभर ३६ जिल्ह्यांतून ३५८ तालुक्यांमध्ये फिरणार आहे. एकूण १४,७७३ किलोमीटरचा प्रवास ही यात्रा करणार असून, ५२ दिवस चालणाऱ्या या मोहिमेचा पहिला टप्पा विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये पार पडणार आहे.
९ ऑगस्ट क्रांती दिन, हा दिवस देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचा एक निर्णायक टप्पा होता. याच दिवशी ‘माझी लाडकी बहीण’सारख्या सामाजिक योजनांपासून वेगळी, पण जनतेशी थेट संवाद साधणारी ‘मंडल यात्रा’ सुरू झाली, हे विशेष लक्षवेधी ठरत आहे.
शरद पवार म्हणाले, "मंडल आयोग देशात लागू होण्याआधी, मुख्यमंत्री असताना आम्हीच महाराष्ट्रात याची अंमलबजावणी केली होती. पण आज भाजप ओबीसी समाजाला घाबरवण्याचं काम करत आहे. त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्यासाठी ही यात्रा काढली जात आहे."
प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सांगितलं, “ही यात्रा महाराष्ट्रात पुन्हा एकदा पुरोगामी विचारांची चळवळ उभी करण्याचा प्रयत्न आहे. विदर्भ हे राष्ट्रवादी विचारांचं गड मानलं जातं आणि लोकसभेत हे पुन्हा सिद्ध झालं आहे.”
आमदार रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले, "प्रत्येक जिल्हा, प्रत्येक तालुक्यात मंडल यात्रेचं स्वागत केलं जाईल. भाजपचं ओबीसींप्रती असलेलं प्रेम केवळ राजकीय स्वार्थासाठी आहे, हे जनता जाणून घेईल. ही जबाबदारी प्रत्येक राष्ट्रवादी कार्यकर्त्याची आहे."
रोहित पवार म्हणतात, "कधी कमंडल यात्रा तर कधी नवा जातीयवाद भाजपने समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. मंडल आयोगाविरोधातील भाजपचा इतिहास ओळखून आम्ही ही मंडल यात्रा उभारली आहे."
ओबीसी समाजात जनजागृती व संवाद
राजकीय स्वार्थासाठी जातीयतेचं राजकारण करणाऱ्या भाजपला प्रत्युत्तर
पक्षाच्या विचारांना पुन्हा बळ देणं व कार्यकर्त्यांत नवचैतन्य निर्माण करणं
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी कार्यसंघ मजबूत करणं
ही यात्रा राजकीय संदेश देतानाच सामाजिक समरसतेचा पुरस्कार करते. सध्याच्या परिस्थितीत, जातीय आणि भाषावादी तेढ निर्माण केली जात असल्याचं पक्षाचं म्हणणं असून, मंडल यात्रा त्याविरोधात एक सकारात्मक चळवळ म्हणून पुढे येत आहे.