
मुंबई : राज्यातून नैऋत्य मोसमी पावसाने माघार घेतली असली तरीही महाराष्ट्रातील काही भागांत पावसाचे सावट कायम आहे. हवामान खात्याने (IMD) पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूरसह १० जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासोबत नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, वातावरणातील बदलांमुळे राज्यात पुन्हा ढगाळ हवामान निर्माण झाले आहे. कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या काही दिवसांत तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागांत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळू शकतात.
गेल्या २४ तासांत कोकण, गोवा आणि विदर्भातील काही ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ नोंदवण्यात आली. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमान सरासरीच्या आसपास राहिले. मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांत उष्णतेचा चटका वाढण्यासोबत दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. तर सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुणे आणि परिसरात आज, शुक्रवारी, तसेच शनिवारी आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे. रविवारपासून बुधवारपर्यंत सकाळच्या वेळी आकाश निरभ्र, तर दुपारी किंवा संध्याकाळी अंशतः ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी हवामानातील बदलांकडे लक्ष ठेवावे.
हवामान विभागाने सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, रत्नागिरी, पुणे, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. वादळी पावसाच्या वेळी नागरिकांनी झाडांखाली किंवा विजेच्या खांबांजवळ थांबणे टाळावे. हवामान विभागाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे.