बाबाजानी दुर्राणींनी का सोडली अजित पवारांची साथ?, शरद पवारांची तुतारी फुंकणार

Babajani Durrani : मला कोणतेही आश्वासन मिळालेले नाही. विचारसरणीच्या आधारावर मी हा निर्णय घेतला असल्याचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी सांगितले आहे.

 

 

Rameshwar Gavhane | Published : Jul 27, 2024 7:09 AM IST / Updated: Jul 27 2024, 03:48 PM IST

Babajani Durrani : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. परभणीतील पाथरी मतदारसंघात अनेक राजकीय घडामोडी घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. परभणीतील पाथरीचे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष असलेले बाबाजानी दुर्राणी शरद पवार गटात जाहीर पक्षप्रवेश करणार आहेत. शनिवारी दुपारी दोन वाजता शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांचा जाहीर पक्षप्रवेश होणार आहे. शरद पवारांसोबत जात असल्याची माहिती स्वतः आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी दिली आहे.

विचारसरणीच्या आधारावर घेतला निर्णय : बाबाजानी दुर्राणी

यावेळी त्यांनी शनिवारी दुपारी दोन वाजता संभाजीनगरातील राष्ट्रवादी काँग्रेस भवनात माझा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होईल. मला कोणतेही आश्वासन मिळालेले नाही. विचारसरणीच्या आधारावर मी हा निर्णय घेतला आहे. मतदारसंघातच नव्हे तर पूर्ण राज्यात माझ्या या निर्णयाचे स्वागत होत आहे. सबंध देशात मुस्लीम समाजाची मोठ्या प्रमाणात कुचंबना होत आहे. भारतीय जनता पक्षासोबत असलेल्या पक्षांना मुस्लीम मतदार मतदान करायला तयार नाहीत. अशा परिस्थितीत एखाद्या पक्षासोबत राहणं आणि काम करणं अवघड होतं. त्यामुळे मी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

पाथरीत बाबाजानी दुर्राणी अजित पवार गटात अस्वस्थ असल्याच्या रंगल्या चर्चा

पाथरीत गेल्या अनेक दिवसांपासून कुजबूज सुरू होती. तूर्त राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष असलेले बाबाजानी हे गेल्या अनेक दिवसांपासून या पक्षात अस्वस्थ असल्याचे वारंवार बोलले जात होते. राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाशी त्यांची बोलणी चाललेली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जर काही शब्द मिळाला तर बाबाजानी हे पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत दिसतील अशी परिस्थिती असल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. अखेर बाबाजानी दुर्राणी शरद पवार गटात जाहीर पक्षप्रवेश करणार आहेत.

कोण आहेत बाबाजानी दुर्राणी?

राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर दोन गट झाले. त्यानंतर बाबाजानी दुर्राणी हे शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांसोबत गेले. त्यांची नुकतीच विधान परिषदेच्या आमदारकीची टर्म संपली आहे. पुन्हा त्यांनी विधान परिषदेचे तिकीट मागितले होते. पण पुन्हा अजित पवारांकडून त्यांना संधी मिळाली नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांकडे परतण्याचा निश्चय बाबाजानी दुर्राणी यांनी केला आहे. शरद पवार गटात पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती बाबाजानी दुर्राणी यांनी दिली आहे. बाबाजानी 2004 मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर आमदार झाले होते. त्यानंतर 2012 आणि 2018 मध्ये शरद पवारांनी त्यांना विधान परिषदेवर आमदार केले.

आणखी वाचा : 

पूजा खेडकरच्या वडिलांना अटकपूर्व जामीन, IAS पदावरून झाले आहेत निवृत्त

 

 

Share this article