
मुंबई : महाराष्ट्रातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची मालिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून राज्य शासनाने प्रशासकीय फेरबदलांचा सपाटा लावला असून, नुकतेच पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या बदल्यांमध्ये अकोला, वाशिम आणि परभणी या महत्त्वाच्या जिल्ह्यांना नवे जिल्हाधिकारी लाभले आहेत.
वर्षा मीना – अकोल्याच्या जिल्हाधिकारी
संजय चव्हाण – परभणीच्या जिल्हाधिकारी
योगेश कुंभेजकर – वाशिमचे जिल्हाधिकारी
भुवनेश्वरी एस. – महाबीज, अकोलाच्या व्यवस्थापकीय संचालक
रघुनाथ गावडे – मुंबईचे अतिरिक्त मुद्रांक शुल्क नियंत्रक
याआधी तुकाराम मुंढे यांची दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून बदली झाल्यानंतर रिक्त झालेल्या असंगठित कामगार विकास आयुक्तपदी काही दिवसांपूर्वी सुशील खोडवेकर यांची नियुक्ती झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता पुन्हा पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, प्रशासकीय कार्यक्षमतेसाठी आणि नवे नेतृत्व घडवण्यासाठी या बदल्या महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.
वर्षा मीना या अनुभवी आयएएस अधिकारी असून त्यांनी याआधी विविध ठिकाणी महत्त्वाच्या प्रशासकीय जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. अकोल्यासारख्या महत्वाच्या जिल्ह्याच्या प्रशासनाची धुरा त्यांच्या हाती सोपवण्यात आली आहे.
एस. भुवनेश्वरी, २०१५ बॅचच्या आयएएस अधिकारी, मूळच्या तामिळनाडूच्या मद्रास येथील रहिवासी आहेत. त्यांनी संगणक विज्ञानात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आपल्या प्रशासकीय कारकिर्दीत त्यांनी कोल्हापूर येथे सहायक जिल्हाधिकारी, यवतमाळ जिल्ह्यात उपविभागीय अधिकारी, तसेच नाशिक, भंडारा व धुळे जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. याशिवाय त्यांनी नागपूर स्मार्ट सिटीच्या सीईओ, तसेच वनामतीच्या महासंचालकपदीही जबाबदारी सांभाळली आहे. आता त्यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली आहे.
या आधी डॉ. अशोक करंजकर यांची महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे सदस्य सचिव म्हणून, तर संजय कोलते यांची मुंबईतील शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या सर्व बदल्यांमुळे राज्याच्या प्रशासनात नवीन ऊर्जा व कार्यशैली येण्याची अपेक्षा आहे.