
महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ११ हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सचे परवाने निलंबित केले आहेत. यात डॉमिनोज पिझ्झाच्या दोन आऊटलेट्सचाही समावेश आहे. २१ आणि २२ ऑक्टोबरला राज्यभरात ही तपासणी मोहीम राबवण्यात आली. गुरुवारी जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, या कारवाईत अधिकाऱ्यांनी ५४.६६ लाख रुपये किमतीचा तब्बल ३७,९९१.४ किलो अन्नसाठा जप्त केला आहे. मुंबईतील नऊ आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील दोन आस्थापनांवर ही कारवाई झाली. अस्वच्छ स्वयंपाकघर, तुंबलेली गटारे, गंजलेली उपकरणे आणि मिठाईमध्ये बेकायदेशीर रंगांचा वापर अशा अनेक त्रुटी या तपासणीत आढळल्या.
FDA च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हॉटेल्समध्ये अन्न सुरक्षा नियमांचे सर्रास उल्लंघन होत होते. परत आलेल्या जुन्या ब्रेडमध्ये नवीन ब्रेड मिसळणे, तापमानाची नोंद न ठेवणे आणि कामगारांकडे आवश्यक वैद्यकीय प्रमाणपत्रे नसणे अशा अनेक गंभीर बाबी समोर आल्या.
अधिकाऱ्यांना तपासणीदरम्यान स्वयंपाकघरात प्रचंड अस्वच्छता आणि खराब ड्रेनेज सिस्टीम आढळली. तसेच, अन्न ठेवण्याचे रॅक आणि भांडी गंजलेली होती. मिठाईमध्ये आरोग्याला घातक असलेल्या अनधिकृत रंगांचा वापर होत असल्याचेही उघड झाले.
अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यांतर्गत (Food Safety and Standards Act) ही धडक कारवाई करण्यात आली आहे.
मुंबईत ज्या नऊ आस्थापनांचे परवाने निलंबित झाले आहेत, त्यात माझगावची एस के बेकरी, ग्रँट रोडचे नेकझाद रेस्टॉरंट, वांद्रे पश्चिमेकडील फूडीज मल्टी कुझिन, जोगेश्वरी पश्चिमेकडील अरेबियन लुकमा, कुर्ला पश्चिमेकडील दिल्ली झायका, घाटकोपर पश्चिमेकडील आर सिटी मॉलमधील यू मी, गोवंडीतील बिक्कगणे बिर्याणी आणि भांडुप पश्चिमेकडील डॉमिनोज पिझ्झा यांचा समावेश आहे. याशिवाय, बीडमधील डॉमिनोज आऊटलेट आणि परभणीच्या रहमत नगरमधील के के बेकर्सवरही कारवाई करण्यात आली आहे.
परवाने निलंबित करण्यासोबतच, FDA ने निकृष्ट दर्जाचा आणि आरोग्याला अपायकारक ठरू शकणारा मोठा अन्नसाठाही जप्त केला आहे.
कोकण विभागात सर्वात मोठी कारवाई झाली. नवी मुंबईतील आरडीसी ॲग्रो व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड (RDC Agro Ventures Pvt Ltd) मधून अधिकाऱ्यांनी ५०.०५ लाख रुपये किमतीचा ३३,२८६ किलो राजमा आणि डाळी जप्त केल्या. हा साठा निकृष्ट दर्जाचा असून त्यावर चुकीचे लेबल लावल्याचा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
नाशिक विभागातही अधिकाऱ्यांनी १.७० लाख रुपये किमतीचे ४८३.४ किलो अन्नपदार्थ जप्त केले. यामध्ये रिफाइंड सोयाबीन तेल, बटर, तूप, पिवळी शेव आणि पापडी यांचा समावेश आहे.
उत्पादनांच्या दर्जाबाबत शंका आल्याने ही कारवाई करण्यात आली. एका ठिकाणी तर प्रयोगशाळा, तांत्रिक व्यक्ती आणि विश्लेषण अहवाल यापैकी काहीच उपलब्ध नसल्याचे अधिकाऱ्यांना आढळले.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर विभागात औरंगाबाद कोल्ड स्टोरेज एलएलपी (Aurangabad Cold Storage LLP) मधून २.९१ लाख रुपये किमतीचा ४,२२२ किलो गूळ आणि बडीशेप जप्त करण्यात आली आहे.
अन्नाचा दर्जा आणि स्वच्छतेवर परिणाम करणाऱ्या बाबींवर लक्ष केंद्रित करून राज्यभरात ही मोहीम राबवण्यात आली. अन्न साठवण्याच्या चुकीच्या पद्धती, खराब उपकरणे, कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांचा अभाव आणि उत्पादनांवरील चुकीचे लेबलिंग अशा अनेक त्रुटी FDA च्या निदर्शनास आल्या.
११ परवाने निलंबित करणे आणि अmuन्नसाठा जप्त करणे हा अन्न सुरक्षा नियमांतर्गत केलेल्या कारवाईचाच एक भाग आहे. मात्र, हे निलंबन किती काळासाठी असेल किंवा या हॉटेल्सना पुन्हा व्यवसाय सुरू करण्याची परवानगी कधी मिळेल, याबाबत निवेदनात कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
(एजन्सीच्या इनपुट्ससह)