Polyhouse Farming : फुलांच्या शेतीतून दिवसाला 12 हजारांची कमाई, महिन्याला अडीच लाखांचा नफा; तरुणाची जबरदस्त आयडिया

Published : Sep 10, 2026, 06:04 PM IST
Polyhouse Farming : फुलांच्या शेतीतून दिवसाला 12 हजारांची कमाई, महिन्याला अडीच लाखांचा नफा; तरुणाची जबरदस्त आयडिया

सार

महाराष्ट्रातील शेतकरी अर्जुन साबळे यांनी पारंपरिक शेतीला रामराम ठोकत संरक्षित शेतीचा मार्ग निवडला. फक्त एक एकर जागेत पॉलीहाऊसमध्ये गुलाब आणि जरबेराची लागवड करून ते आता दिवसाला तब्बल १२ ते १३ हजार रुपये कमावत आहेत. एका छोट्या प्रयोगातून सुरू झालेला हा प्रवास आता वर्षभर नफा देणारा मोठा व्यवसाय बनला आहे.

मुंबई : शेतकऱ्यासाठी जास्त पिकवणं म्हणजे जास्त कमावणं असं नेहमीच होत नाही. महाराष्ट्रातील शेतकरी अर्जुन साबळे फक्त एक एकर जमिनीवर गुलाब आणि जरबेराच्या शेतीतून दिवसाला जवळपास १२ ते १३ हजार रुपये कमावतात. पण त्यांची ही गोष्ट थेट गुलाबाच्या शेतीपासून किंवा मोठ्या पॉलीहाऊसपासून सुरू झाली नाही. त्यांचं कुटुंब पिढ्यानपिढ्या झेंडू आणि शेवंतीची फुलं पिकवून मुंबईत विकायचं. पण जेव्हा फुलांचे भाव घसरू लागले आणि स्पर्धा वाढली, तेव्हा साबळे यांनी आपल्या शेतीतून नफा वाढवण्यासाठी वेगळा मार्ग शोधायला सुरुवात केली.

30Stades च्या वृत्तानुसार, याच गरजेतून साबळे संरक्षित शेतीकडे (Protected Farming) वळले. २०१६ मध्ये त्यांनी फक्त १० गुंठे, म्हणजे सुमारे पाव एकर जागेत हा प्रयोग सुरू केला. एका छोट्या प्रयोगातून सुरू झालेला हा प्रवास आज फुलांच्या मोठ्या व्यवसायात बदलला आहे, जो त्यांना वर्षभर उत्पन्न मिळवून देतो.

शेती विषयात BSc करत असताना त्यांनी वेगवेगळ्या पिकांचा अभ्यास करण्यासाठी अनेक शेतांना भेटी दिल्या. तेव्हा पॉलीहाऊसमधील उत्पादन पाहून त्यांना संरक्षित फूलशेतीमध्ये रस निर्माण झाला. याच काळात त्यांनी बंदिस्त वातावरणात गुलाबाची शेती होत असल्याचं पाहिलं.

साबळे यांनी सुरुवातीला १० गुंठे जागेवर गुलाबाची लागवड केली. यासाठी त्यांनी बंगळूरूमधील एका शेतकऱ्याकडून १२ रुपये प्रति रोप या दराने सुमारे ८,००० रुपयांची रोपं खरेदी केली.

“तेव्हा मी पॉलीहाऊसमध्ये गुलाबाची शेती पाहिली आणि या संरक्षित शेती पद्धतीमुळे मी खूप प्रभावित झालो. मी १० गुंठ्यांपासून, म्हणजे सुमारे पाव एकर जागेपासून (१०,००० चौरस फूट) सुरुवात केली आणि हळूहळू विस्तार केला,” असं ते म्हणाले.

सुमारे सहा महिन्यांनंतर, या शेतातून दररोज ५०० गुलाब निघू लागले. हे गुलाब त्यांनी स्थानिक बाजारात ५ रुपये प्रति नग दराने विकले, ज्यामुळे त्यांना दिवसाला सुमारे २,५०० रुपये मिळू लागले. या यशामुळेच त्यांनी आपल्या शेतीचा विस्तार केला आणि त्यात जरबेराची भर घातली.

आज साबळे एका एकरात गुलाब आणि जरबेराची शेती करतात, ज्यात प्रत्येकी १६,००० रोपं आहेत. ते 'टॉप सीक्रेट' किंवा 'ताज महाल' नावाने ओळखल्या जाणाऱ्या डच हायब्रीड गुलाबाच्या वाणाची लागवड करतात. त्यांच्या शेतातून दररोज सुमारे २,००० जरबेरा आणि १,००० गुलाब निघतात. गुलाबाला ५ रुपये आणि जरबेराच्या काडीला ४ रुपये भाव मिळतो. यातून त्यांना अनुक्रमे ५,००० आणि ८,००० रुपये दररोज मिळतात.

साबळे यांची रोजची कमाई १२,००० ते १३,००० रुपयांच्या घरात आहे. महिन्याला साडेतीन लाखांपेक्षा जास्त विक्री होते आणि निव्वळ नफा सुमारे अडीच लाख रुपये असतो. ते नैसर्गिकरित्या हवेशीर राहणाऱ्या पॉलीहाऊसमध्ये गुलाब आणि जरबेराची लागवड करतात, ज्यात इलेक्ट्रिक कुलिंग फॅनऐवजी बाजूचे पडदे आणि छतावरील झडपांचा वापर केला जातो. २०१५-१६ मध्ये त्यांच्या पहिल्या १०,००० चौरस फुटांच्या पॉलीहाऊससाठी सुमारे ३ लाख रुपये खर्च आला होता.

ही रोपं पाच ते सात वर्षे उत्पादन देत असल्याने सुरुवातीचा खर्च काही वर्षांतच वसूल होतो. ते पिकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मायक्रो स्प्रिंकलर, ठिबक सिंचन आणि आठवड्यातून एकदा फवारणी करतात. फुलांची विक्री थेट स्टॉल्स आणि घाऊक बाजारात केली जाते, तर मागणीनुसार जरबेराची फुलं बंगळूरू, वडोदरा, अहमदाबाद, हैदराबाद आणि मुंबईला पाठवली जातात.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Amravati Hospital Fire : चौकशीत मोठा हलगर्जीपणा उघड, सरकारचे कडक कारवाईचे आदेश
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लंडनमध्ये मोठा सन्मान, म्हणाले - 'हा महायुतीच्या कामाचा गौरव'