Baby Sold For Smartphone : फोनसाठी आई-वडिलांनीच विकलं स्वतःचं बाळ, आजारपणामुळे फुटलं बिंग

Published : Oct 03, 2026, 04:02 PM IST
Sambhajinagar Crime

सार

छत्रपती संभाजीनगरमध्ये एका धक्कादायक घटनेत आई-वडिलांनीच आपल्या एक महिन्याच्या बाळाला पैशांसाठी विकलं. या पैशांतून त्यांनी मोबाईल आणि दागिने खरेदी केले. पण आईच्या आजारपणामुळे हे बिंग फुटलं. पोलिसांनी या प्रकरणी आई-वडिलांसह ७ जणांना अटक केली असून बाळाची सुटका केली आहे.

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जन्मदात्या आई-वडिलांनीच आपल्या एक महिन्याच्या बाळाला पैशांसाठी विकलं. या पैशांतून या जोडप्याने नवीन मोबाईल आणि दागिने खरेदी करून मज्जा मारली. पण बाळाला विकल्याचा हाच निर्णय त्यांच्या अंगलट आला आणि या गुन्ह्याचं बिंग फुटलं.

बाळाला विकल्यानंतर काही दिवसांतच आई आजारी पडली. छातीत दूध साचल्याने तिला त्रास होऊ लागला. डॉक्टरांनी तिला बाळाला दूध पाजण्याचा सल्ला दिला. तेव्हा तिला बाळाची आठवण आली. तिने बाळाला परत मागितले, पण ज्यांना बाळ विकलं होतं त्यांनी ते देण्यास नकार दिला. पैसे परत मागितले तर या जोडप्याने ते आधीच उडवले होते. यावरून त्यांच्यात वाद झाला आणि हे प्रकरण चव्हाट्यावर आलं. मुकुंदवाडी पोलिसांनी या प्रकरणी आई-वडिलांसह सात जणांना अटक केली आहे. बाळाला एका सामाजिक संस्थेकडे सोपवण्यात आलं आहे.

आई-वडिलांनीच केला बाळाचा सौदा

पोलिसांच्या माहितीनुसार, वंदना कांबळे आणि योगेश कांबळे हे गेल्या दोन-तीन वर्षांपासून एकत्र राहत होते. ५ जुलै रोजी घाटी रुग्णालयात वंदनाने एका मुलाला जन्म दिला. बाळ जन्माला आल्यावर त्यांनी त्याला विकण्याचा कट रचला. वंदनाने तिच्यासोबत काम करणाऱ्या कौशल्या पवारला बाळ विकायचं असल्याचं सांगितलं. त्यानंतर कौशल्याने तिची मुलगी सीमा रेशवाल हिची वंदनाशी ओळख करून दिली. तपासात असं समोर आलंय की, आई-वडिलांनी १ लाख २० हजार रुपये घेऊन बाळ सीमाला दिलं.

यानंतर हे बाळ आणखी काही जणांना विकलं गेल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. हा सौदा तब्बल ३ लाख ५० हजार रुपयांपर्यंत पोहोचला होता. दरम्यान, बाळाला विकून मिळालेल्या पैशांतून आई-वडिलांनी मोबाईल आणि दागिने घेतले होते, जे पोलिसांनी आता जप्त केले आहेत.

बाळ आता सामाजिक संस्थेच्या ताब्यात

२७ सप्टेंबर रोजी सुरेश गुंटुका आणि उमा खटकम यांनी बाळाला मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात आणून पोलिसांच्या स्वाधीन केलं. त्यानंतर बाळाला बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात आलं. समितीच्या आदेशानुसार बाळाला 'साकार' या संस्थेकडे सोपवण्यात आलं आहे. या प्रकरणात आतापर्यंत ७ आरोपींना अटक करण्यात आली असून मुकुंदवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक (PI) विवेक सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) हरेश्वर घुगे, हेड कॉन्स्टेबल (HC) कोल्हे, काळे, पोलीस कॉन्स्टेबल (PC) खेडकर आणि गुन्हे शाखा (DB) पथकाने पोलीस उपायुक्त (DCP) रत्नाकर नवले आणि सहाय्यक आयुक्त (ACP) मनीष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Walmik Karad : वाल्मिक कराडभोवती 12 हायटेक कॅमेरे, मोबाइलचा वापर शक्य नाही; बीड जिल्हा कारागृह प्रशासनाचा खुलासा
Mazagon Dock : माझगाव डॉकचा थुथुकुडी प्रोजेक्ट रद्द, आता महाराष्ट्रावर फोकस