Walmik Karad : वाल्मिक कराडभोवती 12 हायटेक कॅमेरे, मोबाइलचा वापर शक्य नाही; बीड जिल्हा कारागृह प्रशासनाचा खुलासा

Published : Oct 03, 2026, 03:15 PM IST
Beed Walmik Karad Jail

सार

बीड जिल्हा कारागृहातून कैदी वाल्मीक कराड मोबाईलचा वापर करून राजकीय कट रचत असल्याचा खासदार बजरंग सोनवणे यांचा आरोप कारागृह प्रशासनाने फेटाळून लावला आहे.

बीड : बीड जिल्हा कारागृहातून मोबाइलवरून संपर्क साधला जात असल्याचा आणि त्यातून राजकीय कट रचला जात असल्याचा खासदार बजरंग सोनवणे यांनी केलेला आरोप बीड जिल्हा कारागृह प्रशासनाने फेटाळून लावला आहे. वाल्मीक कराड ज्या बराकीत आहे, त्या परिसरावर 8 ते 12 हायटेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असून, कारागृहाच्या संपूर्ण परिसरात 106 कॅमेरे कार्यरत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. खासदार सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत वाल्मीक कराड हा कारागृहातून मोबाइलवरून फोन करून आपला मुलगा सौरभ सोनवणे याला गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. यावेळी त्यांनी कथित कॉल रेकॉर्डिंगही ऐकवली होती. या पार्श्वभूमीवर कारागृह प्रशासनाने स्पष्टीकरण देताना संबंधित रेकॉर्डिंग जुनी असल्याचे सांगितले.

यापूर्वीही या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. कारागृह प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, कराड ज्या बराकीत राहतो, तेथे मोठ्या संख्येने कैदी असतानाही छुप्या पद्धतीने मोबाइल वापरणे सहज शक्य नाही. बराकी तसेच परिसरातील हालचाली सीसीटीव्हीच्या निगराणीखाली असल्याने मोबाइलचा वापर झाल्याचा दावा तथ्यहीन असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. तसेच कैद्यांना आठवड्यातून तीन वेळा, प्रत्येकी दहा मिनिटांसाठी पोलिसांनी प्रमाणित केलेल्या तीन नातेवाईकांशी बोलण्याची सुविधा दिली जाते. यावेळी एक अधिकारी आणि दोन कर्मचारी उपस्थित असतात. यापूर्वी नातेवाईकांकडून तिसऱ्या व्यक्तीला कॉन्फरन्स कॉलवर जोडण्याची शक्यता होती. ही त्रुटी दूर करण्यासाठी अँड्रॉइड फोनवर आधारित नवीन यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत असून, सुमारे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. नव्या यंत्रणेमुळे कॉन्फरन्स कॉल जोडण्याची शक्यता बंद होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

"खा. बजरंग सोनवणे यांच्याकडून एक पत्र मिळाले आहे. त्याची चौकशी चालू असून त्यात कोणी दोषी आढळल्यास कारवाई करु", असं बीडच्या पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी सांगितलं.

तसंच "या प्रकरणी यापूर्वी दोन उच्चस्तरीय चौकशा झाल्या असून, कारागृह प्रशासनाच्या कामकाजात कोणतीही त्रुटी आढळली नाही. लोकप्रतिनिधींनी केलेल्या आरोपांत तथ्य नाही. पुन्हा चौकशीला आले तरी आम्ही सामोरे जाण्यास तयार आहोत. कारागृह परिसरात सर्वत्र सीसीटीव्हीची नजर आहे", असं बीडचे कारागृह अधीक्षक, राजाराम चांदणे, यांनी सांगितलं.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Mazagon Dock : माझगाव डॉकचा थुथुकुडी प्रोजेक्ट रद्द, आता महाराष्ट्रावर फोकस
Devendra Fadnavis: निवडणूक आयोगावरील आरोप हा 'फेक नॅरेटिव्ह', फडणवीसांचा पलटवार