आयसीसी टी-20 विश्वचषकात विश्वविजय प्राप्त केलेल्या भारतीय संघाला महाराष्ट्र सरकारच्यावतीने 11 कोटीचे बक्षीस जाहीर केले आहे.
आयसीसी टी-20 विश्वचषकात विजय मिळवून भारतीय क्रिकेट संघाने 11 वर्षांनंतर आयसीसी चषकावर आपले नाव कोरले. त्यानंतर देशभरातून क्रिकेट संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. शुक्रवारी महाराष्ट्राच्या विधीमंडळात मुंबईकर खेळाडू रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय क्रिकेट संघासाठी 11 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले. सरकारी तिजोरीतून 11 कोटींचे बक्षीस जाहीर केल्यानंतर आता विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आधीच भारतीय संघावर कोट्यवधीची उधळण बीसीसीआयकडून झालेली असताना पुन्हा 11 कोटी देण्याची गरजच काय? असा सवाल दोन्ही विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केला आहे.
विधानसेभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, भारतीय संघाने विश्वचषक जिंकला याचा सर्वांनाच आनंद झाला आहे. त्यांना कोट्यवधीची बक्षीसे जाहीर झाली आहेत. ऑस्ट्रेलियाचा संघ जेव्हा विश्वचषक जिंकतो, तेव्हा ते स्वतःच्या बॅगा उचलून घरी जातात. पण भारतात तशी परिस्थिती नाही. भारतातील चाहते क्रिकेटपटूंना डोक्यावर घेतात. मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर आपण पाहिले की, लाखोंच्या संख्येने चाहते रस्त्यावर उतरले होते. चाहत्यांच्या भावनेकडे पाहून मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली असावी, असे दिसत आहे.
‘क्रिकेटपटू पैशांसाठी नाही, तर देशासाठी खेळतात’
सरकारी तिजोरीतून 11 कोटी देण्याची काही गरज नव्हती. मुंबईकर चार खेळाडूंना एक-एक कोटी देण्याची घोषणा झाली होतीच. मग इतर खेळाडूंना बक्षीस देण्याची कोणतीही आवश्यकता नव्हती, असेही वडेट्टीवार म्हणाले. क्रिकेटपटूंना आधीच खूप पैसे मिळाले आहेत. क्रिकेटपटू पैशांसाठी नाही तर देशासाठी खेळतात, मग त्यांना पैसे का देत आहात? असाही सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
वडेट्टीवार पुढे म्हणाले की, गेल्या चार महिन्यात 1 हजार 68 आत्महत्या झाल्या आहेत. ही अधिकृत माहिती आहे. शेतकऱ्यांना जर मदत मिळत नसेल तर सरकारचा पर्दाफाश जनता करेल. क्रिकेट खेळाडूंना बीसीसीआयने 125 कोटी दिले आहेत, तरीही सरकारी तिजोरीतून पैसे देण्याची गरज नव्हती. मात्र स्वतःची पाठ थोपटवून घेण्यासाठी हे बक्षीस दिले गेले. गरीब मेला तरी चालेल पण सरकारला थाप मिळाली पाहीजे, असा काही राज्यकर्त्यांचा उद्देश दिसतो.
‘मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या खिशातून 11 कोटी द्यावेत’
वडेट्टीवार यांच्याप्रमाणेच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही या निर्णयावर कडाडून टीका केली. “सरकारी तिजोरीतून बक्षीस देण्याची गरज नव्हती. तसेच खेळाडूंनाही बक्षिसाची गरज नाही. बीसीसीआयकडून त्यांना खूप मानधन मिळते. एवढा मोठा निधी राज्याच्या तिजोरीतून देण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या खिशातून बक्षीस द्यायला हवे होते”, अशी टीका दानवेंनी केली.
आणखी वाचा :