'लाडकी बहीण' योजनेवरुन प्रश्न उपस्थित करत राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

बदलापूर शाळेतील चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'लाडकी बहीण' योजनेवरुन प्रश्न उपस्थित करत त्यांनी मुलींच्या सुरक्षेची हमी मागितली आहे.

 

Rameshwar Gavhane | Published : Aug 21, 2024 9:30 AM IST / Updated: Aug 21 2024, 03:03 PM IST

मुंबई: बदलापूर शाळेतील चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणावरुन सध्या जनभावना उसळल्या असून लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. सर्वसामान्य नागरिकांकडूनही या घटनेचा निषेध केला जात असून राज्यभरात या घटनेचे पडसाद उमटल्याचे पाहायला मिळत आहे. बदलापूरमध्ये मंगळवारी या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले होते, त्या आंदोलनावेळी आरोपीला आजच फाशी द्या, अशी मागणी आंदोलकांनी केली. तसेच लाडकी बहीण नको, सुरक्षित बहीण योजना आणा, असे फलकही आंदोलकांकडून झळकले. त्यामुळे या घटनेचे राजकारण केले जात असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. तर विरोधकही या घटनेवरुन आक्रमक झाले आहेत, मविआकडून 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ट्विट करुन राज्य सरकारला चांगलंच फैलावर घेतले आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याला बुधवारपासून सुरुवात झाली असून बुधवारी ते गोंदिया जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेत आहेत. दरम्यान बदलापूर बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनेवरुन संतप्त शब्दात राज ठाकरे यांनी भावना व्यक्त करत सरकारला धारेवर धरले आहे. बदलापूरमध्ये जी अत्यंत दुर्दैवी आणि भीषण घटना घडली, त्यावर मी मंगळवारी पण म्हणलं तसं, यावर कारवाई व्हायला इतका वेळ का लागला? या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या महिला पदाधिकाऱ्यांनी वाचा फोडली, विषय लावून धरला, आणि त्यातून जनआक्रोशाला तोंड फुटल्याचे राज ठाकरेंनी म्हटले. मुळात हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा जिल्हा. या जिल्ह्यातच जर कायदा धाब्यावर बसवला जात असेल तर बाकी ठिकाणची परिस्थिती काय असेल याची कल्पना पण करवत नाही. आज सरकार 'लाडकी बहीण' योजनेच्याद्वारे स्वतःच कौतुक करून घेण्यात मग्न आहे, पण जर तुमची बहीण खरंच लाडकी असेल तर तिच्यावर अशी वेळ येऊ नये आणि दुर्दैवाने आलीच तर तिला न्याय मिळेल हे पाहणं, हे पहिलं कर्तव्य नाही का ?, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

स्वत:च ब्रँडिंग करण्यापेक्षा तिच्या सुरक्षेची भावना निर्माण करा

जनतेच्या पैशातून, बहिणींना पैसे देऊन, स्वतःचं ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे, ही भावना जरी निर्माण केलीत तरी खूप आहे. माझ्या पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांमुळे हा विषय आज समोर आलाय, याचा मला अभिमान आहे. पण मुळात असे प्रकार घडू नयेत यासाठी कडक कायदे आणि त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, असेही राज यांनी ट्विटरवरुन लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

 

 

आणखी वाचा :

बदलापूर अत्याचार प्रकरणी संतापाची लाट, 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक

Share this article