महाविकास आघाडीत विसंवाद? राऊतांचा सुळे यांना घणाघात; पवार गटाकडून प्रत्युत्तरात खडेबोल!

Published : May 29, 2025, 09:31 PM IST
sanjay raut and supriya sule

सार

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना अप्रत्यक्ष टोला लगावल्याने महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला आहे. 

मुंबई: महाविकास आघाडीतील तणाव पुन्हा एकदा उफाळून आला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांना अप्रत्यक्ष टोला लगावल्याने आघाडीत अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालं आहे. राऊत यांच्या 'गटाराचं पाणी' या उपमेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, प्रशांत जगतापांनी राऊतांना थेट खडेबोल सुनावले आहेत.

राऊतांचा खोचक इशारा – "तहान लागली म्हणून गटाराचं पाणी प्यायचं?"

एका पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले, "तहान लागलेली असेल, पण कुणी गटाराचं पाणी पीत नाही. कुठल्या डब्यात उडी मारायची, महासागरात जायचं तर तिथं लाटा आहेत, गर्दी आहे. प्रत्येकाला स्वतःचं स्थान शोधावं लागेल," असा स्पष्ट इशारा देत त्यांनी अप्रत्यक्षपणे सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली.

प्रशांत जगतापांचे प्रत्युत्तर – "राऊतांनी अभ्यास करावा, पवारांचं वजन कधी हललेलं नाही!"

या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते प्रशांत जगताप यांनी राऊतांवर तोफ डागली. "शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या ६० वर्षांत एकही हालचाल त्यांच्या संमतीशिवाय घडू दिलेली नाही," असं सांगताना त्यांनी राऊतांना सुचवलं की, "तुम्ही शरद पवारांचा अभ्यास करावा, त्यांच्या निर्णयक्षमतेवर प्रश्न उपस्थित करणं म्हणजे अनुभव आणि विचारांचं दुर्बल दर्शन आहे."

महाविकास आघाडीत मिठाचा खडा?

जगताप पुढे म्हणाले, "संजय राऊतांनी सतत टीकेची टोकं करून महाविकास आघाडीत मिठाचा खडा टाकू नये. काँग्रेसमधील एका नेत्यानेही अलीकडे राहुल गांधींविषयी केलेल्या वक्तव्याने अस्वस्थता वाढवली आहे. अशा टोकाच्या प्रतिक्रियांनी आघाडीत एकोपा निर्माण होत नाही," असा सल्ला त्यांनी दिला.

पवार गटाचे संकेत – आमचं नेतृत्व मजबूत, निर्णय आमच्या हातीच

प्रशांत जगतापांनी स्पष्ट केलं की, "सुप्रिया सुळे, शरद पवार यांच्यासारखं नेतृत्व स्वतःचा पक्ष कुठे न्यावा, कसा वाढवावा हे ठरवण्यात पूर्ण सक्षम आहे. अशा नेत्यांबाबत खोचक विधानं करणं म्हणजे आघाडीतील सलोखा धोक्यात घालणं होईल."

आघाडी एकत्र राहणार की उधळणार?

महाविकास आघाडीमध्ये भांडणं आणि मतभेद हे काही नवीन नाहीत, पण राऊत-सुळे- पवार यांच्यातील ताजा वाद आघाडीच्या भवितव्यासाठी घातक ठरू शकतो. आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत की, या टोलेबाजीचं उत्तर शरद पवार थेट देतील का, की मागेच राहून संयम पाळतील?

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

BMC Elections 2025 : महापालिका निवडणुकीसाठी भाजप–शिंदे गट एकत्र लढणार; महायुतीत जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात
Shivraj Patil Chakurkar : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन