
Ladki Bahin Yojana : राज्य सरकारची अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ नंदुरबार जिल्ह्यात एका धक्कादायक गैरप्रकारामुळे चर्चेत आली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या या योजनेचा लाभ चक्क 710 पुरुषांनी घेण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. जिल्हा प्रशासनाच्या सतर्क छाननीमुळे हा प्रकार वेळेत समोर आल्याने मोठा आर्थिक गैरवापर टळला आहे.
नंदुरबार जिल्हा महिला व बालकल्याण विभागामार्फत योजनेसाठी आलेल्या अर्जांची सध्या युद्धपातळीवर तपासणी सुरू आहे. आधार कार्ड, बँक तपशील आणि लिंगाची पडताळणी करत असताना काही अर्जांमध्ये संशयास्पद माहिती आढळली. सखोल चौकशीत महिलांसाठी असलेल्या या योजनेत तब्बल 710 पुरुषांनी ऑनलाईन अर्ज भरल्याचे स्पष्ट झाले. आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करून योजनेचा हप्ता मिळवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
हा प्रकार उघडकीस येताच जिल्हा प्रशासनाने तात्काळ पावले उचलली. महिला व बालकल्याण विभागाने संबंधित सर्व 710 अर्ज अपात्र ठरवत पोर्टलवरून बाद केले आहेत. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, प्राथमिक छाननीतच हा गैरप्रकार पकडल्याने एकाही पुरुष अर्जदाराच्या खात्यात योजनेची रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे सरकारी निधीचा संभाव्य गैरवापर रोखण्यात यश आले आहे.
महिलांसाठी राखीव असलेल्या योजनेत खोटी माहिती देऊन अर्ज करणे म्हणजे शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न मानला जात आहे. या प्रकरणामुळे प्रशासकीय यंत्रणेवर अतिरिक्त ताण निर्माण झाला असून, आता संबंधित अर्जदारांवर फौजदारी कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून योजनेच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.