
मुंबई : माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना दरमहा मिळणाऱ्या १५०० रुपयांच्या हप्त्याची वाट महिलांना लागली आहे. ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार?, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात एक संभाव्य तारीख समोर आली आहे, जी महिलांसाठी दिलासादायक ठरू शकते.
गेल्या महिन्यात, म्हणजेच जुलैचा हप्ता रक्षाबंधनाच्या निमित्ताने महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. त्यामुळे आता ऑगस्टचा हप्ता देखील लवकर मिळेल अशी अपेक्षा आहे.
सध्या अधिकृत तारीख जाहीर झालेली नसली तरी, हप्ता ऑगस्टच्या शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नेहमीप्रमाणे, हप्ता दर महिन्याच्या शेवटच्या पंधरवड्यात जमा केला जातो. त्यामुळे यावेळी देखील १५०० रुपये ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
गणेश चतुर्थीचा सण जवळ येत असल्याने, अनेकजण अंदाज व्यक्त करत आहेत की गणेशोत्सवाच्या आधी किंवा त्याच काळात हप्त्याचा पैसा खात्यात येऊ शकतो. सण-उत्सवांचा मूहूर्त साधून सरकारकडून रक्कम दिली जाते, हे मागील ट्रेंडवरून दिसून आले आहे.
मात्र, काही महिलांसाठी ही बातमी निराशाजनक ठरू शकते. कारण लाडकी बहीण योजनेतून सुमारे ४२ लाख महिलांचे अर्ज अमान्य (बाद) करण्यात आले आहेत. या महिलांना पुढे कोणताही हप्ता मिळणार नाही.
अर्ज निकषांनुसार नव्याने पडताळणी सुरू आहे. अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन माहिती तपासत आहेत. ज्या महिला शासकीय निकषांमध्ये बसणार नाहीत, त्यांचा लाभ थांबवण्यात येणार आहे. त्यामुळे योजनेचा लाभ सुरू ठेवायचा असेल, तर सर्व कागदपत्रे व पात्रतेची पूर्तता आवश्यक आहे.