माधुरी हत्तीणीच्या सुटकेसाठी कोल्हापुरात आत्मक्लेष पदयात्रेची घोषणा, राजकीय नेते आणि जनतेचा मोठा पाठिंबा

Published : Jul 31, 2025, 05:22 PM IST
madhuri elephant

सार

माधुरी हत्तीणीला परत जैन मठात आणण्यासाठी कोल्हापुरकर पुढे सरसावले आहेत. त्यांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन मोहिमा सुरु केल्या आहेत. आता हत्तीण परत येते की नाही हे बघण्यासारखे आहे.

कोल्हापूर - शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील प्रसिद्ध महादेवी मठामधून माधुरी हत्तीणीला जामनगर येथील वनताराकडे सुपूर्द करण्यात आल्यानंतर प्रचंड जनआक्रोश निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांसह अनेक सामाजिक संघटना आणि राजकीय नेत्यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला असून, माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी जोरदार मोहीम राबवली जात आहे. याबाबत ऑनलाईनही #BringBackMadhuri ही मोहिम राबवली जात आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी येत्या रविवारी (दि. ४ ऑगस्ट) आत्मक्लेष पदयात्रेचे आयोजन केल्याची घोषणा केली आहे. ही पदयात्रा नांदणी येथून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघणार आहे. शेट्टी यांनी सर्वपक्षीय नेत्यांना आणि महादेवीवर प्रेम करणाऱ्या नागरिकांना या पदयात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

या पदयात्रेद्वारे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती देखील शेट्टी यांनी दिली. त्यांच्या मते, माधुरी हत्तीणीला परत नांदणीत आणणे ही जनतेची भावना आहे आणि तिचा आदर होणे आवश्यक आहे.

दरम्यान, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी यासाठी सह्यांची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेद्वारे लोकांचा पाठिंबा मिळवून सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. खासदार धैर्यशील माने यांनीही हे प्रकरण संसदेत उपस्थित करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

हत्तीणीला पाठविण्याच्या निर्णयानंतर निर्माण झालेला संताप अद्याप शमलेला नाही. कोल्हापूर जिल्ह्यात विविध स्तरांवरून माधुरीसाठी आवाज उठवला जात आहे. ही मोहीम आता जनचळवळीचे रूप घेत आहे आणि तिचा पुढील टप्पा आत्मक्लेष पदयात्रा ठरणार आहे.

माधुरीसाठी कोल्हापूर एकवटत आहे आणि आता लक्ष दिलं जातंय की केंद्र आणि राज्य सरकार यावर काय भूमिका घेतंय!

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Nashik Accident News : सप्तश्रृंगी गडाच्या घाटात भीषण अपघात; संरक्षण कठडा तोडून इनोव्हा दरीत कोसळली, पाच जण ठार असल्याची भीती
Adiwasi Land Rules: आदिवासींची जमीन खरेदी-विक्री करता येते का? कायदा नेमकं काय सांगतो? जाणून घ्या महत्वाची माहिती