
पंढरपूर: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 26 भारतीय पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्याला पाकिस्तानकडून थेट पाठबळ असल्याचे पुरावे समोर येत असून, यानंतर भारताने सैन्य सरावात आक्रमकता दाखवायला सुरुवात केली आहे. अशा संवेदनशील काळात ज्योतिषाचार्य अतुलशास्त्री भगरे यांनी एक गंभीर इशारा दिला आहे. पुढील 36 तासांत युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता आहे, असा त्यांनी दावा केला आहे.
भगरे गुरुजी म्हणतात, “पाकिस्तानला आता जगापुढे उघडं पाडलं जातंय. त्यांनी पुन्हा एकदा काश्मीरमध्ये कुरापत केली आणि भारत सजग झाला आहे. केंद्र सरकार निर्णायक पावलं उचलण्याच्या तयारीत आहे. पण त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे ग्रहमान भारतासाठी अनुकूल आहे, तर पाकिस्तानसाठी अत्यंत प्रतिकूल."
29 मार्च रोजी शनी मीन राशीत प्रवेश केला असून, ही स्थिती भारताच्या राशीसाठी शुभ मानली जाते. मे महिन्यात गुरु, राहू आणि केतू यांसारख्या महत्त्वाच्या ग्रहांचा संचारही घडत आहे, ज्यामुळे राजकीय, लष्करी आणि आर्थिक क्षेत्रात मोठ्या उलथापालथी होण्याची शक्यता आहे.
“भूकंपासारख्या नैसर्गिक घटना नव्हे, तर दोन देशांमधील थेट युद्ध आणि मोठ्या प्रमाणात होणारी हानी ही खऱ्या अर्थाने उलथापालथ ठरेल,” असं भगरे गुरुजींचं स्पष्ट मत आहे.
भगरे गुरुजी पुढे म्हणतात, “भारताच्या बाजूने सध्या जागतिक महासत्ता उभ्या आहेत, जे आपल्या विजयाला निश्चित करतं. मात्र युद्धाचा खर्च रोज काही हजार कोटींवर जाऊ शकतो. त्यामुळे केंद्र सरकारकडे एक मध्यम मार्गही आहे – जलसंपत्ती नियंत्रणासारखे उपाय, जे पाकिस्तानच्या गळ्याला फास ठरू शकतात.”
पाकिस्तान सध्या अन्नान्न दशेत आहे. आयात-निर्यात ठप्प आहे, तीन लाख लोक बेरोजगार झाले आहेत आणि युद्ध त्यांच्यासाठी आत्मघातकी ठरू शकतं. “त्यांचं राशीचक्रही प्रतिकूल आहे. 14 ऑगस्टच्या मध्यरात्री जन्म झाल्याने त्यांच्या राशीतील ग्रहसंयोग भारताच्या तुलनेत वाईट आहेत,” असं भगरे गुरुजी म्हणतात.
"पाकव्याप्त काश्मीर ताश्कंद करारामुळे त्यांच्या हातात गेला, पण लवकरच तिथे पुन्हा भारताचा झेंडा फडकताना दिसेल. 36 तासात युद्ध सुरू होऊ शकतं, आणि मे महिना निर्णायक ठरेल. 31 मेपर्यंत जगाच्या नजरा भारत-पाक संघर्षावर खिळलेल्या असतील," असा ठाम विश्वास अतुलशास्त्री भगरे यांनी व्यक्त केला.
ज्योतिषशास्त्राच्या आधारावर अतुलशास्त्री भगरे गुरुजींनी दिलेला हा इशारा सामान्य जनतेपासून ते सरकारपर्यंत प्रत्येकासाठी विचार करण्यासारखा आहे. युद्ध नको, पण जर ते अटळच असेल, तर त्यासाठी आपली तयारी ग्रहमानही स्पष्टपणे दर्शवत आहे.